रत्नागिरी - कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचा अतोनात नुकसान झाले आहे. मनुष्यहानी, वित्तहानी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून नेतेमंडळींचे दौरे सुरू झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी (governor bhagat singh koshyari) आज रत्नागिरीतील (ratangiri) पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी, केंद्राकडून आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्वासन राज्यपालांनी चिपळूणवासीयांना दिले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी राज्यपालांच्या दौऱ्याबाबत विधान करताना, केंद्राकडून जास्त निधी आणावा, असे म्हटले होते. राज्यपालांनीही या दौऱ्यात केंद्राकडून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. "दौरे होत आहेत त्यानं धीर मिळतो. पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळे दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळे यंत्रणेला त्रास होतो. ठिक आहे राज्यपाल जात आहेत त्यांचे केंद्राचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे ते जास्त मदत आणू शकतात. केंद्रातून मदत मिळवून देण्यासाठी राज्यपालांचा उपयोग व्हावा", असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
शरद पवारांच्या विधानाची अप्रत्यक्षपणे दखलच राज्यपाल यांनी घेतल्याच चिपळूणमध्ये दिसून आलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज सकाळी तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलार होते. त्यानंतर त्यांनी चिपळूण शहराची पाहणी केली. चिपळूणमधील बाजारपेठेतही त्यांनी फेरफटका मारला. तत्पूर्वी आढावा बैठकही घेतली.
अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर ही दुर्दैवी वेळ आली आहे. मात्र, प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी, असे राज्यपालांनी गुहागर येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकीत सूचना दिल्या. 'मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे, केंद्र शासनाकडूनही आवश्यक ती मदत दिली जाईल, संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी आहे, असेही राज्यपालांनी सांगितले.