चिपळूण : राज्यातील शाहीरी, तमाशा, लोककला, संगीत भजन, कीर्तन, नाटक, दशावतार या लोककलांना राजाश्रय होता; मात्र कोकणातील नमन ही लोेककला उपेक्षित होती. या कलेला राजाश्रय मिळावा, यासाठी केलेल्या प्रयत्नांना न्याय मिळाला असून या कलेला आता राजाश्रय मिळाल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदिप सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.कोकणात नमन हा कलाप्रकार अतिशय लोकप्रिय आहे. इतर लोककलांप्रमाणे हाही एक लोककलाप्रकार आहे. कोकणात अनेक कलापथके नमन या प्रकाराने सादर करतात. बहुरंगी पध्दतीचा हा प्रकार लोकांचे मनोरंजन करतो. याला आध्यात्माची जोड दिलेली असते. त्यामुळे परंपरा व संस्कृती संवर्धनाचे कामही यातून होते.अनेक संकटांना सामोरे जावून ही कला सादर केली जाते. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सावर्डे येथे नमनमहोत्सव सादर करण्यात आला होता. त्यानंतर सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांना निवेदन देण्यात आले होते. याबाबतची सर्व तांत्रिक माहिती शासनाने मागवली. विविध अंगाने माहिती घेतली. आम्ही पाठपुरावा सुरुच ठेवला होता. या बाबत सविस्तर माहिती दिली व हे आवश्यक का आहे हे पटवून दिले. त्यानंतर मंत्री देवतळे यांनी सकारात्मक पवित्रा घेतला. शासनाच्या लोककलावंत पॅकेज योजनेंतर्गत नमनाचा समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या निकषानुसार पात्र ठरल्यानंतर २५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत भांडवली अनुदान मिळेल. तसेच प्रतिप्रयोग १५ हजार रुपये याप्रमाणे एका कलापथकास २० प्रयोगासाठी अनुदान मिळेल. वर्षाला १० नमन मंडळांना याचा फायदा घेता येइल, असेही सावंत यांनी सांगितले.नमन कलेला राजाश्रय मिळाल्याची माहिती व त्यासाठी केलेल्या सर्व स्तरावरील प्रयत्नाना मंत्री पातळीवरही यश आल्यामुळे कलावंतामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता याद्वारे होणाऱ्या मदतीतून ही कला पुढे टिकून राहील, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)
कोकणातील नमन कलेला राजाश्रय
By admin | Published: July 14, 2014 12:05 AM