रत्नागिरी : चाैपदरीकरणाच्या कामामुळे रस्त्यावर आलेल्या चिखलामुळे डंपरवरील नियंत्रण सुटून एसटी बसला धडक बसली. डंपरच्या धडकेमुळे एसटी बस घसरून अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील दाभाेळे घाट येथे घडली. या अपघातात बसचालकासह एक प्रवासी जखमी झाला आहे. सुदैवाने ही बस दरी काेसळता काेसळता वाचली.हा अपघात गुरुवारी सकाळी ८:१५ वाजता झाला. रत्नागिरी आगाराची काेल्हापूर - गणपतीपुळे ही बस (एमएच १४, बीटी २२२९) कोल्हापूर आगारातून गुरुवारी पहाटे ५.३० वाजता सुटली. या बसमधून २८ प्रवासी प्रवास करत हाेते. ही बस संगमेश्वर तालुक्यातील देवळे मार्गावरून धावत असताना दाभोळे घाटात आली. सध्या या मार्गावर रत्नागिरी - नागपूर रस्त्याच्या चाैपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्यावर माेठ्या प्रमाणात चिखल आला आहे.देवळे फाट्यानजीक बस आली असता समोरून येणाऱ्या डंपर (एमएच १०, सीआर २५७३) चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि बसला पुढील बाजूने धडक दिली. या धडकेबराेबर बस वळणावर घसरली. सुदैवाने ही बस दरीत न काेसळता कठड्यावरच उभी राहिली. ही बस दरीत काेसळली असती तर माेठी जीवितहानी झाली असती.या अपघातात एसटी चालक नीलेश गोकुळे जीभकाटे यांच्या दोन्ही पायाला मार आले. तसेच रोहित इंदूलकर हे जखमी झाले आहेत. या अपघातात बसची दर्शनी भागातील काच फुटली असून, गाडीचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. या गाडीतील प्रवाशांना अन्य गाडीने पाठविण्यात आले.
कोल्हापूर-गणपतीपुळे बसला अपघात, चालक जखमी
By मेहरून नाकाडे | Published: July 12, 2024 12:38 PM