अरुण आडिवरेकररत्नागिरी : चप्पल म्हटली की, सर्वांत आधी आठवते ती ‘काेल्हापुरी’. याच चप्पलला आता लंडनमध्येही पसंती मिळत आहे. आडिवरे (ता. राजापूर) या ग्रामीण भागात तयार झालेली ही चप्पल थेट लंडनला पाेहाेचली आहे. आडिवरे गावातील सुनील सूर्यकांत आडिवरेकर या तरुणाने तयार केलेली ही चप्पल सातासमुद्रापार पाेहाेचली आहे.आडिवरे येथे सुनीलचे वडील सूर्यकांत आडिवरेकर यांचे छाेटेसे दुकान आहे. वडिलांसाेबत दुकानात येता येता चप्पल तयार करण्याची कला त्याला आकर्षित करू लागली. त्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी त्याने वडिलांबराेबर व्यवसायाला सुरुवात केली. गाव छाेटेसे असल्याने गावात राहून आपल्या कलेचे चीज हाेणार नाही, असे मनात ठरवून त्याने मुंबई गाठली. मुंबईत आपले बस्तान बसवीत असतानाच वयाच्या २५ व्या वर्षी वडिलांचे अकाली निधन झाले. ज्यांच्या हाताला धरून त्याने व्यवसायाला सुरुवात केली हाेती, ताे मायेचा हातच त्याच्या पाठीवरून दूर गेला हाेता.मुंबईत काम करताना त्याने काेल्हापुरी चप्पल तयार करण्यास सुरुवात केली. त्याने बनविलेली पहिली चप्पल मुंबईतील वरळी भागात गेली आहे. त्याचवेळी साेशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ अपलाेड झाला आणि हा व्हिडीओ पाहून दिल्लीतून पहिली ऑर्डर आली. त्यानंतर हैदराबाद याठिकाणी त्याने चप्पल पाठविली.साेशल मीडियावरील व्हिडीओ पाहून लंडन येथील रतन जयस्वाल नावाच्या व्यक्तीने सुनीलशी संपर्क साधून चप्पलची मागणी केली. त्याने आडिवरे येथून ही चप्पल मुंबईतील अंधेरी येथे पाठविली असून, तेथून ती लंडनच्या दिशेने रवाना झाली आहे.
आज बाबा हवे हाेतेआपल्या वडिलांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या सुनीलचा ते आधारस्तंभ हाेते. वडिलांकडूनच त्याने ही कला अवगत केल्याचे ताे अभिमानाने सांगताे. आज आपण बनविलेली चप्पल लंडनला गेल्याचे बाबांना कळले असते तर त्यांनी माझे काैतुक केले असते. हा आनंदाचा क्षण पाहण्यासाठी ‘आज, बाबा हवे हाेते,’ असे त्याने सांगितले. बाबांच्या आठवणीने त्याचे डाेळे भरले हाेते.
..अन् त्याने मुंबई साेडलीअनेक जण मुंबईत आपले आयुष्य घडविण्यासाठी जातात. तसाच सुनीलही गेला हाेता. मुंबईत राहिल्यानंतर त्याने जम बसविण्यास सुरुवातही केली. मात्र, काेराेनाच्या काळात त्याच्या पंखातील बळ कमी झाले. लग्न झाल्याने बायकाे आणि मुलगी यांची जबाबदारी हाेतीच. त्यामुळे त्याने मुंबई साेडण्याचा निर्णय घेतला आणि ताे आडिवरे गावी आला.