मेहरुन नाकाडेरत्नागिरी : काळाच्या ओघात तिळाचे पीक दुर्लक्षित झाले आहे. पारंपरिक तिळाच्या जाती वापरात असल्या तरी त्यांची उत्पादकता कमी आहे. त्यावर कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने ‘कारळा’ तिळावर संशोधन करून नवीन वाण विकसित केले आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे तिळावरील पहिलेच संशोधन असून, विद्यापीठाने तयार केलेले हे वाण हेक्टरी ४५० ते ५०० किलो उत्पादन देणारे आहे.खरीप हंगामात जिल्ह्यात भात मुख्य तर नागली/नाचणीचे दुय्यम पीक घेतले जाते. पडीक, वरकस, पाण्याचा निचरा होणाऱ्या जागेत तिळाचे पीक उत्तम येते. जिल्ह्यात तीळ लागवडीचे क्षेत्र अवघे ०.२० हेक्टर इतकेच होते. पारंपरिक वाणामुळे उत्पादकता कमी असल्याने २०१४-१५ पासून कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्रात यावर संशोधन सुरू होते. नाशिक, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातील तिळाच्या जाती एकत्र करून संशोधन करण्यात आले. संशोधन पूर्ण होऊन ‘कारळा’चे नवीन वाण विकसित करण्यास यश आले आहे.कमी पाण्यात, कमी दिवसात हे पीक तयार होते. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन वाणाची चाचणी सुरू आहे. गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. शेतकऱ्यांकडून उत्पादकतेची तपासणी सुरू आहे. येत्या काही दिवसात ‘कारळा’ नवीन वाणाचे नामकरण होऊन येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना ‘कारळा’ नवीन वाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आंबा, काजू बागायतीमध्ये आंतरपीक म्हणून ‘कारळा’ तिळाचे घेता येणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना पावसाळी तिळाच्या शेतीतून उत्पन्न मिळू शकणार आहे. काळ्या तिळामध्ये कॅल्शिअम, फायबर, लोह, फाॅस्फरससारखे पोषक घटक आढळतात. जे शरीरासाठी पोषक असतात. आहारात काळ्या तिळाचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारते. केस व त्वचेलाही फायदा होतो. त्यामुळे आहारात तीळ, तिळाचे तेल याचाही वापर केला जातो. तिळात तेलाचे प्रमाण कितपत आहे, यावर पिकाची गुणवत्ता ठरते. संशोधन केंद्रात संशोधित केलेले पीक नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. लागवडीला प्रोत्साहन मिळणार आहे
आंतरपिकातून उत्पन्न
पारंपरिक तिळाची उत्पादकता कमी असल्याने हे पीक दुर्लक्षित झाले, त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून तिळाची आवक होत असे. शेतकऱ्यांकडूनही तिळाच्या वाणासाठी मागणी सुरू होती. विद्यापीठाचे संशोधन पूर्ण होऊन नवे वाण विकसित करण्यास यश आले आहे. ऑगस्टच्या शेवटी लागवड केली तरी तीन महिन्यात पीक तयार होते.कमी श्रम, कमी दिवसविद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे पिकासाठी श्रम, वेळ व पैसा कमी लागतो. तिळातील तेलाचे प्रमाण ४२ टक्के आहे. ३५ ते ४० दिवसात फुलोरा येऊन ९० दिवसात पीक तयार होते. हेक्टरी उत्पादकता ४५० ते ५०० किलो आहे. वन्य प्राण्याचा त्रास नाही. विद्यापीठाची शिफारस असल्याने शासकीय अनुदान उपलब्ध होणार आहे.