गुहागर : भारतात सर्वत्र पर्यटनदृष्ट्या चांगली ठिकाणे आहेत. कोकणात तर सुंदरता भरभरुन आहे. मात्र, याचे प्रमोशन व्हायला हवे. कोकणचे हे सौंदर्य सर्वत्र पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असेल, असे ‘काहे दिया परदेस’मधील शिव (ऋषी सक्सेना) याने गुहागर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.सध्या झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील कलाकार गावागावातून थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन संवाद साधण्यासाठी कोकण दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या.शिवची भूमिका साकारणाऱ्या ऋषी सक्सेना याने सांगितले की, मी मराठीमध्ये पहिल्यांदा काम करत आहे. यावेळी त्याने कोकणच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले. मात्र, हे सौंदर्य जगासमोर येण्याची गरज आहे. ते पर्यटकांसमोर पोहोचले पाहिजे. कोकणच्या सौंदर्याचे अचूक प्रमोशन झाल्यास याठिकाणी आणखी पर्यटक येण्यास मदत होईल, असे सक्सेना याने सांगितले.गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीवने सांगितले की, एकांकिका, पोलीस लाईन, आटपाटी अशामधून काम करत असताना या मालिकेसाठी आॅडिशन दिली व निवडही झाली. तोपर्यंत आपण मोहन जोशी, शुभांगी गोखले यांच्यासोबत काम करणार आहोत हे माहीत नव्हते.निशा वहिनीची भूमिका साकारणाऱ्या नीलम सावंत हिने सांगितले की, बाहेर फिरताना अनेकजण रागाने बघतात, तिरस्कार करतात. एका आजी-आजोबांनी तर गौरीला त्रास देऊ नको, ह्या अशा गोड शब्दात मला समजावण्याचा प्रयत्न केला. यातूनच कामाची खरी पोचपावती मिळते. शुक्रवारी सायंकाळी गुहागरमधील स्थानिकांशी पोलीस परेड मैदान येथे या कलाकारांनी संवाद साधला. यावेळी शिव व गौरीसोबत खेळण्याची संधीही गुहागरवासीयांनी घेतली.(प्रतिनिधी)
कोकणच्या सुंदरतेचे प्रमोशन हवे
By admin | Published: May 29, 2016 11:23 PM