दापोली : कोकोम इव्हेंट आणि दापोलीतील जेसीआय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोळथरे कोकण महोत्सव’ अर्थात ‘कोकोम महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव शुक्रवार दि. २९ एप्रिल ते १ मे २०२२ यादरम्यान पंचनदी येथील व्हॅली विंड्स रिसॉर्टच्या सभा मंडपामध्ये आयोजित करण्यात आला आहे.या महोत्सवाची येत्या शुक्रवारी ग्रंथदिंडी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पूजन करून होणार आहे. शहरातील ए. जी. हायस्कूल येथून या ग्रंथदिंडीला सुरुवात होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, एसटी बसस्थानक चौक, मच्छीमार्केट, बाजारपेठ, परब नाका, पोस्ट गल्ली आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समाप्ती होणार नाही. सायंकाळी ६.३० वाजता व्हॅली विंड्स रिसॉर्टच्या सभा मंडपामध्ये महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातनाम ओडिसी नृत्यांगना रसिका गुमास्ते या विशेष सादरीकरण करणार आहेत. सायंकाळी ७.३० वाजता ‘येवा कोकण आपलाच असा’ या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.३० एप्रिल रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ व निसर्ग मित्र किरण पुरंदरे यांचा ‘चिऊ काऊच्या गोष्टी’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेमध्ये व्यावसायिक परिसंवाद होणार आहे. यामध्ये विशेषतः अरविंद अमृते यांचे कोकणातील उद्योजकता, डॉ. प्रमोद सावंत यांचे कोकणातील पर्यटन व्यवसायाच्या संधी, डॉ. केतकी बर्वे यांचे फूड प्रोसेससिंग परदेशातील संधी या विषयावर संवाद होणार आहे. तसेच सायंकाळी ७.३० ते ८.३० वाजता ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांची ग्रंथ प्रकाशक राजीव बर्वे घेणार आहे.त्यानंतर प्रसिद्ध संगीत आयोजक अमर ओक यांचे बासरी वादक, श्रुती भावे यांचे व्हायोलीन आणि शमिका भिडे यांचा फर्माइश स्वरोत्सव कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र दिन आणि महोत्सवाचा समारोप सोहळा सकाळी १० वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘कोकण सन्मान’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
दापोलीतील कोळथरेत येत्या शुक्रवारपासून 'कोकण महोत्सव'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 1:05 PM