कणकवली : यावर्षी १९ सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी येणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा रेल्वे तिकिटाचे बुकिंग १७ मे पासून आगाऊ पद्धतीने सुरू होणार आहे.कोकणात मोठ्या प्रमाणात होळीसह गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो. घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही १९ सप्टेंबर पासून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दीड, पाच, सात, नऊ किंवा अकरा दिवसांमध्ये साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवासाठी प्रत्येक घरामध्ये मुंबई, पुणे येथून चाकरमानी येत असतात. त्यामुळे त्यांना प्रवासाचे नियोजन आगावू करावे लागते. यंदा १९ सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी असली तरी पूर्व तयारीसाठी अनेकजण गावाकडे येणार आहेत. यासाठी रेल्वेचे बुकिंगचे आतापासूनच नियोजन केले जात आहे. येत्या १७ मे पासून १४ सप्टेंबर, १८ मे रोजी १५ सप्टेंबर असे आरक्षण करता येणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी चार जूनला २ ऑक्टोबरचे बुकिंग होणार आहे. नियमित गाड्यांबरोबर जादा गाड्या यावेळी सोडल्या जातात. त्यामुळे सध्या तरी कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या गाड्यांसाठी १७ मे पासून गणेशोत्सवासाठी आगाऊ आरक्षण उपलब्ध होणार आहे. गौरी-गणपती उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी १२० दिवसांचे हे आगाऊ आरक्षण करावे लागणार आहे.मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम अद्याप पूर्ण झालेले नाही. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील या महामार्गाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणला केंद्र शासनाने दिल्या आहे. हा महामार्ग वाहतुकीस योग्य झाल्यास खासगी गाड्या मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल झाल्यास रेल्वेचा भार कमी होण्याची शक्यता आहे. सध्या या महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेक चाकरमानी पुणे, सातारा, कोल्हापूर ते कोकण असा प्रवास करतात. त्यामुळे काही मंडळी रेल्वेचा पर्याय निवडतात. त्यामुळे रेल्वेच्या आगाऊ आरक्षणासाठी चाकरमानी प्रयत्नशील राहणार आहेत.
गणेशोत्सवासाठी यंदा पाच महिने आधीच बुकिंग सुरु, कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन; कधीपासून सुरु होणार बुकिंग...जाणून घ्या
By सुधीर राणे | Published: April 24, 2023 3:51 PM