लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव हा सर्वात लोकप्रिय सण असल्याने मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होतात. यंदाही कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांमधून हजारो मुंबईकर जिल्ह्यात दाखल झाले आहे. परतीसाठीही जादा गाड्या सोडण्यात आल्या असल्या तरीही सध्या २६ सप्टेंबरपर्यंत या सर्व रेल्वे गाड्यांची आरक्षणे फुल्ल झाली आहेत.
होळी आणि गणेशोत्सवासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने जिल्ह्यात येतात. त्यांच्या आगमनासाठी कोकण रेल्वे मार्गावर अनेक गाड्या सोडल्या जातात. यावर्षीही जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मुंबईकर गणेशभक्तांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर सुमारे २५३ पेक्षा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंग राखले जावे, यासाठी या सर्व गाड्यांची आगावू आरक्षण करावी लागत होती. त्यामुळे रत्नागिरीत येणाऱ्या भक्तांना आगावू आरक्षणे करूनच यावे लागले. आता काहींच्या दीड दिवसाचे तर काहींच्या पाच दिवसांच्या गणेशाचे विसर्जन झाले असल्याने पुन्हा चाकरमानी परतू लागले आहेत. यासाठीही कोकण रेल्वेने परतीच्या दहा स्पेशल गाड्या सोडल्या आहेत. त्यांचीही आगावू आरक्षणे करण्यात येत आहे. सध्या या सर्व गाड्यांची आरक्षणे २६ सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाली आहेत.
.....................
मुंबईकरांना तिकिटाची प्रतीक्षा
-कोरोना काळात खबरदारीची उपाययोजना करून कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या.
- गणेशोत्सवात सुमारे २५५ विशेष फेऱ्या सोडून मुंबईकर गणेशभक्तांना दिला दिलासा.
-कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच विशेष गाड्यांचे आगावू आरक्षण असल्याने मुंबईकरांना तातडीचे तिकीट मिळणे अवघड.
.....................
सध्या सुरू फेऱ्या
कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी कोकणात येणाऱ्यांसाठी सुमारे २५३ फेऱ्या सोडण्यात आल्या. त्यानंतर आता परतीसाठी १० विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
................
कोकण मार्ग हाऊसफुल्ल
कोकण रेल्वेचा प्रवास सुखकारक असल्याने वर्षभर कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्यांना नेहमीच गर्दी होत असते. कोरोना काळात या मार्गावरील दोन पॅसेंजर गाड्या बंद ठेवण्यात आल्या असून सर्व विशेष गाड्या या मार्गावरून धावत असून त्यांचीही आरक्षणे पूर्ण आहेत.
........................
कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाय
अजूनही कोरोनाचा प्रादुर्र्भाव सुरू असल्याने काेकण रेल्वेकडून खबरदारी.
मास्क बरोबरच युनिव्हर्सल पास असल्यासच रेल्वेत प्रवाशाला परवानगी.
७२ तासांपूर्वी कोरोनाची चाचणी केली असल्यास त्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतलेले असल्यास प्रवास करण्यास मुभा.