विहार तेंडुलकर
रत्नागिरी , दि. १६ : कोकणवासियांची जीवनवाहिनी बनून राहिलेल्या कोकण रेल्वेने वयाची २७शी पूर्ण केली आहे. डोंगराळ भाग अन् सह्याद्रीच्या कडेकपारी भेदून धावणाऱ्या कोकण रेल्वेने विकासाचे अनेक टप्पे पादाक्रांत केले असून २८व्या वर्षात पदार्पण करताना नानाविध सुविधा प्रवाशांना खुल्या करून देण्याच्या दृष्टीने विविध निर्णय घेतले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात कोकण रेल्वेला निव्वळ ६१ करोडचा नफा प्राप्त झाला आहे तर यापूर्वीच्या वार्षिक उत्पन्नात गेल्या तीन वर्षात ६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधील लोकांना मनाने जवळ आणणाऱ्या कोकण रेल्वे यंदा २७वा स्थापना दिवस साजरा करत आहे. केवळ प्रकल्प राबवूनच न थांबता प्रवाशी वाढीबरोबरच प्रवाशांना विविध सोयी सुविधा देण्याच्यादृष्टीने कोकण रेल्वेने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत.त्याचा फायदा कोेकण रेल्वेला मिळत असून गेल्या तीन वर्षात कोकण रेल्वेला ६१ कोटींचा नफा झाला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेचे आर्थिक उत्पन्न हे २१५२ करोडपर्यंत पोहोचले आहे. ९० बोगदे, २ हजार पूल आणि ५६४ खोलवर कटींग्जने पूर्णत्वास गेलेल्या कोकण रेल्वे प्रकल्पांतर्गत आता प्रवाशांची वाढती गर्दी पाहता आणखीन १० नवीन स्थानकांचे काम सुरु करण्यात आले आहे.
चिपळूण, कणकवली, कुडाळ स्थानकाच्या विस्ताराचे तसेच सावंतवाडी टर्मिनसच्या फेज-१चे काम पूर्णत्वास गेले आहे. सावंतवाडी टर्मिनस फेज-२चे काम सध्या सुरु आहे. कोकण रेल्वेने प्रवाशांना नानाविध सुविधाही पुरवल्या आहेत. त्यामध्ये २९ महत्वाच्या स्थानकावर मोफत वायफाय सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत.दहा नवीन स्थानकांचे काम सुरुकोकण रेल्वे मार्गावर जी दहा नवीन स्थानके होणार आहेत, त्यामध्ये कोलाड व माणगावदरम्यानचे इंदापूर स्थानक, माणगाव ते वीरदरम्यानचे गोरेगाव रोड स्थानक, वीर ते करंजाडीदरम्यानचे सापे वामने स्थानक, दिवाणखवटी ते खेडदरम्यानचे कळबणी स्थानक, आरवली रोड ते संगमेश्वर दरम्यानचे कडवई स्थानक, आडवली ते विलवडे दरम्यानचे वेरवली स्थानक, राजापूर ते वैभववाडीदरम्यानचे खारेपाटण स्थानक, वैभववाडी ते नांदगाव दरम्यानचे आचिरणे स्थानक, गोकर्ण ते कुमठा दरम्यानचे मिर्जन स्थानक, उडपी ते पाडबुरीदरम्यानचे इनंजे स्थानक यांचा समावेश आहे.कोकण रेल्वे टाकणार पुढचं पाऊल
- रोहा ते वीर दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरु.
- रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे कामही प्रगतीपथावर.
- जयगड-डिंगणी रेल्वेमार्गाचे कामही सुरु.