रत्नागिरी : कोकण रेल्वे कॉपोर्रेशनमार्फत स्टेशन मास्तर, मालवाहतूक गार्ड, अकाऊंटस असिस्टंट आणि वरिष्ठ लिपीक अशा १२४ पदांच्या भरतीसाठी अर्जाचे शुल्क ५०० रुपये ठेवणे अन्यायकारक आहे. तसेच कोकणातील उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रावर बोलावणे हे त्याहून अधिक आर्थिक भुर्दंड सोसायला लावणारे आहे. व्यवस्थापनाने हे हेतूपूरस्सर केल्याचा आरोप कोकणभूमी कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केला आहे.महाराष्ट्रातील कोकण प्रांत, गोवा व कर्नाटक राज्यातील कोकण रेल्वे मार्गालगतच्या गावांचा व शहरांचा विचार न झाल्याने बेरोजगार तरूणांमध्ये कोकण रेल्वे भरती प्रक्रियेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मुळात ११२ पदांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागवणे व सदरहू अर्जाची फी ५०० रुपये ठेवणे चुकीचे आहे.भरतीचे आॅनलाईन अर्ज भरताना जवळचे परीक्षा केंद्र निवडण्याची सोय आवश्यक होती. मात्र, तसे न झाल्याने कोकण विभागातील परीक्षार्थींना परीक्षेसाठी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र येथे जावे लागणार आहे. त्यासाठी या बेरोजगार उमेदवारांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
तसेच या परीक्षा केंद्रावर वेळीच पोहोचता न आल्याने किंवा उमेदवारांची राहण्याची व्यवस्था न झाल्यास परीक्षा देण्यापासूच ते वंचित राहिले तर त्याला कोकण रेल्वे प्रशासनातील भरती अधिकारीच कारणीभूत राहतील, असे कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष विनायक मुकादम, सचिव अमोल सावंत यांनी म्हटले आहे. तशा आशयाचे पत्रही त्यांनी कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांना ई-मेलद्वारे पाठवले आहे.कोकण रेल्वे भरतीसाठीचे अर्ज आॅनलाईन मागविण्यात आल्याने सर्व पदांसाठी एकूण अर्ज किती आले व त्यापैकी प्रकल्पग्रस्त उमेदवार किती आणि इतर उमेदवारांचे अर्ज किती आहेत, याची वर्गनिहाय संख्या कोकण रेल्वेने जाहीर करावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी केले आहे.रत्नागिरीत उद्या उमेदवारांची बैठककोकण रेल्वेच्या आधीच्या अनेक अधिसूचनांनुसार ज्या उमेदवारांनी परीक्षा दिल्या होत्या. परंतु, काही कारणाने कोकण रेल्वे प्रशासनाने त्यांना डावलले त्या २०० उमेदवारांची यादी रेल्वे प्रशासनाकडे ९ मे २०१८ रोजी देण्यात आली होती. त्याचे उत्तर कोकण रेल्वेकडून समितीकडे आले असून, ह्या विषयासहित नवीन भरतीत प्रकल्पग्रस्तांची झालेली फरपट या विषयावरील चर्चेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सिव्हील हॉस्पिटलजवळ, रत्नागिरी येथे रविवार दिनांक १ जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.