रत्नागिरी : एखादी चांगली गोष्ट सरकारकडून करून घ्यायची असेल तर दबावगट हवा. असा गट रत्नागिरीत कार्यरत असल्याबद्दल आनंद वाटतो. कोकणात करण्यासारखे खूप आहे. कोकणी माणूस उद्योजक होऊ शकतो, असे प्रतिपादन भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केले.
ते म्हणाले, इको टुरिझम, स्थानिकांचा सहभाग घेऊन पर्यटन विकास व त्यातून रोजगाराच्या दृष्टीने यातून पावले उचलावीत. देशांतर्गत पर्यटनालाही भरपूर वाव आहे. उत्तरेतील अनेक पर्यटक गोव्यात हमखास जातातच. त्यांना कोकणात वास्तव्यासाठी आकृष्ट केले पाहिजेरत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे दुसरी शाश्वत पर्यटन परिषद बुधवारी आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. अल्पबचत सभागृहात ही परिषद दिवसभर आयोजित केली होती.
यावेळी आमदार तथा भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सांगितले की, भाजप शासनाने कोकण पर्यटन महामंडळाची स्थापना केली. पर्यटनाला चालना देण्यासाठी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील गावे दत्तक घेऊन त्यातील ५०० घरांमध्ये न्याहरी निवास योजना आखली.
त्यासाठी तीनही जिल्हा बँकाच्या अध्यक्षांशी चर्चा करून १०० कोटी रुपये देण्याचे ठरले. या योजनेतून पर्यटक नक्की कोकणात राहतील, जास्तीत जास्त पर्यटन उद्योजकांनी यात भाग घ्यावा, असे आवाहन यांनी केले.समुद्रकिनारे साफ करणे हे थोडे कठीण काम आहे. याकरिता जर्मनमधून आयात केलेले एक मशीन मी आमदार निधी व सीएसआरमधून रत्नागिरीसाठी दिले आहे. आणखी तीन मशीन देण्याचा मानस आमदार लाड यांनी व्यक्त केला.
निसर्गयात्री संस्थेच्या आपलं गाव अॅपची माहिती मुंबईतील प्रत्येकाच्या घरात कशी पोहोचेल, यासाठी प्रयत्न करू आणि लवकरच याबाबत बैठक बोलावू, अशी ग्वाही प्रसाद लाड यांनी दिली.