देवरुख : संगमेश्वर तालुक्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून मातृमंदिर संस्थेने डाॅ. परमेश्वर गोंड यांच्या एसएमएस हॉस्पिटलच्या सहकार्याने देवरुख येथे ३० बेडचे अद्ययावत कोविड केअर सेंटर उपलब्ध करून दिले आहे. संगमेश्वर तालुका परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मातृमंदिरचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी केले आहे.
संगमेश्वर तालुका हा सह्याद्रीच्या खोऱ्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश आहे. आजही येथील अनेक भागांत आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. गेल्या महिनाभरात खेड्यापाड्यांतून कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यातील पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा दोन अंकी संख्या पार करू लागला. त्यामुळे तालुक्यात ३०-३५ गावे कंटेन्मेंट झोन जाहीर झाले. रुग्णांना रत्नागिरी, चिपळूण येथे जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच ॲाक्सिजनची व्यवस्था नाही. अशा वातावरणात तहसीलदार सुहास थोरात यांनी मातृमंदिर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काेविड सेंटर सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्यात आला. हा प्रस्ताव मान्य करून तहसीलदार थाेरात यांनी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी तत्काळ मान्यता दिली.
डाॅ. परमेश्वर गोंड यांचे एसएमएस हाॅस्पिटलचे संपूर्ण व्यवस्थापन पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. त्यामध्ये डाॅ. प्रकाश पाटील, डाॅ. निकिता धने, डाॅ. प्राजक्ता शिंदे - पाटील आणि सर्व टीम कार्यरत आहे. या ठिकाणी ऑक्सिजन आणि आयसीयूची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज वाढल्यास अधिक आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील, असे डाॅ. गोंड यांनी सांगितले. संस्थेचे कार्यवाह आत्माराम मेस्त्री, अनिल अणेराव, विलास कोळपे, नाना कोळवणकर, सुचेता कोरगावकर यांचाही या उपक्रमात सहभाग आहे.
.............................
वैचारिक बांधिलकीतून उभारणी
मातृमंदिर संस्थेची स्थापना मावशी हळबे यांनी पूज्य सानेगुरुजी यांचा मूल्याधिष्ठित आदर्शाने राष्ट्रसेवादलाच्या वैचारिक बांधिलकीतून केली आहे. राष्ट्रसेवादलाचे अध्यक्ष डाॅ. गणेश देवी यांनी सेवादल कार्यकर्त्यांनी, संस्थांनी कोविड प्रश्नावर प्राधान्याने काम करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत देवरुख येथील मातृमंदिरने आपल्या हाॅस्पिटल कॅम्पसमध्ये ३० बेडचे अद्ययावत कोविड केअर रुग्णालय सुरू केले आहे.