खेड : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या स्तरावर उपाययोजना करत आहे. खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेनेही या कामी प्रशासनाला हात देण्याचा प्रयत्न केला आहे. खेड शहरातील खांबतळ्याचे नजीक असलेली शिवतेज आरोग्य सेवा संस्थेची प्रशस्त इमारत प्रशासनला कोविड सेंटरसाठी देण्याचा निर्णय शिवतेज आरोग्य सेवा संस्थेने घेतला आहे. खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजन शेळके यांनी या इमारतीची पाहणी केली.
गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णांची उपचारांच्या दृष्टीने हेळसांड होऊ नये यासाठी राज्याचे माजी पर्यावरणमंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतेज आरोग्य सेवा संस्थेची ही इमारत कोविड सेंटरसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या इमारतीत १०० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याशिवाय रुग्णांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांची संस्थेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करून अनेकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या वेळीही ग्रामीण भागात संस्थेच्या माध्यमातून सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
......................................
khed-photo171 खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या इमारतीत कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.