मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीच्या पुढाकाराने मंडणगड शहर व तालुक्यातील नागरिक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकरिता कोविड चाचणी शिबिर पार पडले. यावेळी १५०हून अधिक नागरिकांनी अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या करून घेतल्या.
लोटेत प्लॅस्टिक खरेदीसाठी गर्दी
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे येथील बाजारपेठेत प्लॅस्टिक खरेदीसाठी ग्राहकांची बुधवारी गर्दी केली हाेती. ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात लाॅकडाऊन हाेण्याची घाेषणा केल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली हाेती.
कशेडीत दोन वाड्यांनाही टँकरने पाणी
खेड: तालुक्यातील कशेडी-बंगलाठोपाठ बोरटोक व थापेवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी अर्ज केल्यासाठी प्रशासनाने सर्वेक्षण केले. त्यानुसार शनिवारपासून या दोन्ही वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली.
विजय आंब्रेकडून साहित्य वाटप
खेड : पुणे येथील पोलीस अधिकारी विजय आंब्रे यांनी तालुक्यातील गणवाल-कळंबटेवाडी येथील ३० गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. काेरोनाच्या संकटामुळे अनेक गरजू कुटुंबे आर्थिक कोंडीत अडकले आहेत.
मुरूडमध्ये कुटुंबांना मदत
दापोली : दापोली तालुक्यातील मुरूड येथील एन. के. वराडकर हायस्कूल मधील २०१३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे मुरूड, कर्दे व आसूद या तीन गावातील २० गरजू विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना काही जीवनाश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. या माजी विद्यार्थ्यांकडून गेल्यावर्षीही कोविड काळात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले होते.
जालगावमध्ये मास्क, गाेळ्या वाटप
दापोली : दापोली पोलीस स्थानकांतर्फे ग्राम दत्तक योजनेंतर्गत जालगाव-ब्राह्मणवाडीतील ४० ग्रामस्थांना मास्क वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. विद्या दिवाण, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक निनाद कांबळे, उपसरपंच विकास उर्फ बापू लिंगावले, पोलीसपाटील देवेंद्र शिंदे उपस्थित होते.
गुणदेत सॅनिटायझर, साबण वाटप
आवाशी : खेड तालुक्यातील भोस्ते जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुनील मोरे यांच्याकडून गुणदे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गुणदे ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशासेविका व पोलीस पाटील यांना सॅनिटायझर व साबणाचे वाटप करण्यात आले.