राजापूर : धोपेश्वर - बारसूमध्ये येऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी सध्या विविध चाचण्या सुरू असतानाच या प्रकल्पाकरिता चिपळूण येथील कोयना अजवल राजापुरात आणावे, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे.
रिफायनरी प्रकल्पाद्वारे उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या तसेच व्यवसाय याव्यतिरिक्तदेखील या प्रकल्पाचा सर्वंकष फायदा राजापूर व पर्यायाने कोकणी जनतेस व्हावा याकरिता महत्त्वाच्या तीन बाबींकडे आ. साळवी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
रिफायनरी प्रकल्पाकरिता वार्षिक सुमारे २ ते २.५ टीएमसी इतक्या मोठ्या स्वरूपाच्या पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत राजापूर तालुक्यात औद्योगिक प्रकल्पाकरिता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध नाही. मात्र ६७.५ टीएमसी पाणी कोयना धरणाच्या कोळकेवाडी जलाशयातून वीज निर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे समुद्रात सोडण्यात येते. या पाण्याचा विनियोग या प्रकल्पासाठी होऊ शकतो. याकरिता सुमारे १२० किलोमीटर लांबीची पाण्याची पाईपलाईन आवश्यक आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
चिपळूण ते राजापूर दरम्यान चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, ओणी, पाचल यासारखी दाट लोकसंख्या असलेली शहरे व गावे आहेत. त्यांना याच पाईपलाईनआधारे पाणीपुरवठा होऊ शकतो. वाया जाणारे हे पाणी दक्षिणेकडे वळविल्यास दुबार पीक योजनाही राबवता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
राजापुरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रील गाळ उपसण्यासाठी रिफायनरीसारख्या प्रकल्पाद्वारे तंत्र कुशलता व आर्थिक पाठबळ उपलब्ध होऊ शकते. राजापूर शहरातील पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामार्फत अर्जुना व कोदवली नदीतील सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील गाळ उपसा करण्याची मागणीही साळवी यांनी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान कापल्या गेलेल्या झाडांच्या बदल्यात किमान रत्नागिरी जिल्ह्यातील महामामार्गावर कमीत कमी एक लाख झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावण्याची योजना या प्रकल्पाकडे प्रस्तावित करीत आहे. वृक्षारोपण आणि पाच वर्षे त्याची देखभाल ही जबाबदारी कंपनीकडे सोपवावी, अशी मागणीही आमदार साळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.