फोटो ओळ : राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या पदकांसमवेत क्रीडापटू क्रांती म्हसकर व प्रशिक्षक प्रवीण भुवड.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : चिपळूण तालुक्यातील डेरवण यूथ गेम या राज्यस्तरीय स्पर्धेत मंडणगड तालुक्यातील नारगोली येथील क्रांती मिलिंद म्हसकर हिने १८ वर्षांखालील वयोगटात लांब उडी व शंभर मीटर धावणे या दोन क्रीडाप्रकारांत राज्यात प्रथम क्रमांकांची विजेती होण्याचा मान मिळविला आहे. डेरवण येथे २४ ते ३१ मार्च २०२१ या कालवधीत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
मंडणगड तालुक्यातील नवी दिशा स्पोर्ट्स अकॅडॅमीच्या एकूण १३ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला हाेता. यात ‘मंडणगड एक्स्प्रेस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीने दोन क्रीडाप्रकारांत अतिशय उत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. तिच्या या यशाबद्दल क्रांती व तिचे प्रशिक्षक प्रवीण भुवड यांचे तालुक्यातील विविध स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.