चिपळूण : जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी होण्यासाठी जिल्ह्यात ८ दिवस निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कुंभार्ली घाटाच्या सीमेवरील तपासणी आणखी कडक करण्यात येणार आहे, अशी माहिती शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
ते म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी अलोरे - शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली जाईल. गर्दी असेल तेथील नागरिकांची यापुढेही अँटिजन तपासणी सुरू राहणार आहे. कोरोनाची रुग्णसंख्या लवकर कमी होण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न होत असताना ग्रामस्थांकडून सहकार्य अपेक्षित आहे.
कुंभार्ली घाट रस्तामार्गे जिल्ह्याची सीमा ओलांडून लोक प्रवास करतात. अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही ई पास असल्याशिवाय यापुढे सोडले जाणार नाही. खोटे ई पास आणि बनावट अँटिजन रिपोर्ट घेऊन येणाऱ्यांवर यापूर्वी कारवाई केली आहे. पुढील आठ दिवस आणखी कडक मोहीम राबविली जाणार आहे. कुंभार्ली घाटात तीन पोलीस कर्मचारी, एक होमगार्ड आणि महसूलकडून उपलब्ध झालेले दोन कर्मचारी असे एकूण सहाजणांचे पथक कार्यरत असते. आता आठ दिवसांसाठी आणखी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.