लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : तालुक्यात ग्रामीण भागात काेराेनाचा उद्रेक हाेण्यास लग्न समारंभ कारणीभूत ठरत आहेत. तालुक्यातील कुंभवडे वावुळवाडी येथे सोमवारी एकाच दिवशी तब्बल ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ही माहिती कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर चौरे यांनी दिली. त्यामुळे सध्या कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९६ रुग्ण ॲक्टिव्ह असल्याची माहिती डॉ. चौरे यांनी दिली.
यापूर्वी कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रिंदावण व नाणार परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. उपचारांती हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले असतानाच सोमवारी वावुळवाडी येथे ३३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने व वाडीमध्ये लग्न समारंभ कार्यक्रम झाल्याने या भागातील २७९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ५० वर्षांवरील ९ जणांना रायपाटण व धारतळे कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले असून, २४ जणांना कुंभवडे हायस्कूल येथे स्वतंत्र तयार करण्यात आलेल्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याचे डॉ. चौरे यांनी सांगितले.
तालुक्यात कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना संसर्ग रोखण्यात आरोग्य अधिकारी डॉ. चौरे यांच्यासह डॉ. मीनाक्षी शिंदे, आरोग्य कर्मचारी व ग्रामकृती दलांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अन्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तुलनेत कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांचा मृत्यूदर हा सर्वांत कमी आहे. आजपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर आजपर्यंत १९० रुग्ण आढळले आहेत. सध्या ९६ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी सण, समारंभ न करता कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन डॉ. चौरे यांनी केले आहे.