दापाेली : कुणबी समाजोन्नती संघ कुणबी भवन मुंबई, विद्यार्थी वसतिगृह मुलुंडकरिता महाविकास आघाडी सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाच कोटी रुपये देण्यात आले आहेत. वसतिगृहाचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. आता दापाेलीमध्ये कुणबी भवन उभारून समाजाची गेली अनेक वर्षांची मागणी पूर्ण करू, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
कुणबी समाजोन्नती संघ कुणबी भवन मुंबईच्या मुलुंड येथील विद्यार्थी वसतिगृहाकरिता महाविकास आघाडी सरकारकडून पाच कोटी रुपये मिळवून दिल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचा शनिवारी दापोली येथे कुणबी समाजोन्नती संघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार तटकरे बाेलत हाेते. यावेळी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, नगरसेवक खालिद रखांगे, जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, जिल्हा परिषद सदस्य नेहा जाधव, पंचायत समिती सभापती योगिता बांद्रे, कुणबी समाजाचे नेते शंकर कांगणे, संदीप राजपुरे, रमेश पांगत उपस्थित होते.
कुणबी समाज उन्नती संघाची गेल्या ४० वर्षांची मागणी होती. ही मागणी खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेल्याचे कुणबी समाजाचे नेते शंकर कांगणे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कुणबी समाजातर्फे पाच मागण्या त्यांच्याकडे ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, उर्वरित मागण्याही पूर्ण हाेतील, असा विश्वास शंकर कांगणे यांनी व्यक्त केला.
यावेळी संदीप राजपुरे म्हणाले की, कुणबी समाजाने आजपर्यंत दिलेला शब्द नेहमीच पाळला आहे; परंतु या समाजाच्या पदरी निराशेशिवाय काहीही पडले नाही. यापुढे या समाजाचे हक्क घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी सांगितले. रमेश पांगत यांनी सांगितले की, दापोली तालुक्यातील कुणबी समाजाला हक्काचे समाजमंदिर मेळावा अशी भूमिका अनेक वर्षे मांडली जात आहे; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापुढे समाजाच्या हितासाठी यापुढे राजकारणापलिकडे जाऊन मैत्री करण्याची गरज आहे. यापुढे जो पक्ष आमच्या हिताचे काम करेल अशाच पक्षाला भविष्यात समाज मदत करेल, असे यावेळी ठामपणे सांगितले.
-------------------------
कुणबी समाजाला प्रतिनिधीत्व मिळालेच पाहिजे
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कधी काळी कुणबी समाजाचे नऊ आमदार होते; परंतु आता मात्र जिल्ह्यांमध्ये एकही आमदार नाही, ६५ टक्के असलेल्या या कुणबी समाजाला रत्नागिरी जिल्ह्यातून प्रतिनिधीत्व मिळावा, अशी भूमिका वेगवेगळ्या पक्षांकडे मांडण्यात आली. परंतु, समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नाही. यापुढे समाजाचा वाटा मिळालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका भविष्यात असणार आहे, असे यावेळी ठामपणे सांगण्यात आले.