राजापूर : मोठा गाजावाजा करून खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केलेल्या तालुक्यातील ओणी येथील कोविड रुग्णालयात अपुऱ्या सेवा सुविधांमध्ये रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या या रुग्णालयाची जबाबदारी राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री पाहत असून, ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचारी ओणी कोविड रुग्णालयात नेऊन रुग्णांवर उपचार करीत आहेत. अपुऱ्या साेयीसुविधा असताना रुग्णालय सुरू करण्याची घाई का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गत वर्षभरात राजापूर तालुक्यात शासकीय कोविड रुग्णालय सुरू करण्याबाबत कोणतेच प्रयत्न शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदारांनी केले नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तालुक्यात उद्रेक झाल्यानंतर तालुक्यात कोविड रुग्णालय सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. ओणी येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत हे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय झाला. यासाठी आमदार राजन साळवी यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. ३० बेडचे रुग्णालय या ठिकाणी सुरू करण्यात आले. यात २५ ऑक्सिजन बेड व पाच आसीयू बेड यांचा समावेश आहे.
मात्र, अत्यंत घाईगडबडीत सुरू केलेल्या या रुग्णालयात अनेक सेवासुविधांची पूर्तता नसल्याची बाब आता उघड झाली आहे. सध्या या रुग्णालयात चार एमबीबीएस डॉक्टर, दहा वॉर्ड बॉय आणि एक परिचारिका असे कर्मचारी आहेत. प्रत्यक्षात या रुग्णालयात पाच आयसीयू बेड असल्याने त्यासाठी एम. डी. फिजिशियन आणि भूलतज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यक असतानाही त्यांची नियुक्ती झालेली नाही, तर दहा परिचारिकांची भरती करणे आवश्यक असताना केवळ एकच परिचारिका या ठिकाणी काम करीत आहे, तर २५ ऑक्सिजन बेड व पाच आसीयू बेड असल्याने अत्यावश्यक सेवेसाठी दोन डुरा गॅस सिलिंडर उपलब्ध असणे आवश्यक असताना उपलब्ध झालेले नाहीत.
सध्या या रुग्णालयात दहा कोरोना संसर्गाचे रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दहा परिचारिकांची गरज असताना केवळ एकच परिचारिका असल्याने मग डॉ. राम मेस्त्री यांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयातील काही परिचारिकांना याठिकाणी ड्यूटी लावत काम सुरू ठेवले आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या आधारावर या रुग्णालयाचा कारभार हाकला जात आहे.