कै. गाडगीळ गुरुजी वाचनालयातून आणलेली पुस्तकेही त्याचवेळेस वाचून काढायचो. मधुभाईंचा ‘चिवारी’ नावाचा कथासंग्रह मी याच कंदिलाच्या उजेडात वाचल्याचे मला आजही आठवते. कंदील आणि मामाने दिलेला बुश कंपनीचा रेडिओ असे दोघेजण माझी दररात्री अशी उशिरापर्यंत सोबत करायचे. अभ्यास करता करता ‘बेला के फूल’ संपल्याशिवाय झोपायचे नाही, असा माझा अलिखित नियमच होता. आमच्या आवाटातली भाऊचायेही गिमात फाटफटी असाच कंदील घेऊन पोखरावर पाण्यासाठी जायची. कंदिलाला वाघही घाबरतो व जवळ येत नाही, यावर तिचा ठाम विश्वास होता. एकदा खरेच भाऊचाये कंदील घेऊन पोखरावर गेली होती आणि वर काही अंतरावर वाघोबा पाटातले पाणी पित बसले होते. पाणी पिऊन झाल्यावर वाघोबा एकदाच मोठी डरकाळी फोडून बिरामणाच्या आडव्याच्या वाटेला लागले, पण तोपर्यंत भाऊचायेच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते. भाऊचाये जीव मुठीत धरून धावत घरी आली. सकाळी मग जो समोर दिसेल त्याला सांगत सुटली, ‘कंदिलान माका वाचल्यान... नायत वाघ ठेवता काय...?’ आमच्या आवाटातला रामा गाडीवाला असेच कंदील गाडीला बांधून देवगड, कणकवलीपर्यंत रात्रीचा बैलगाडीचा प्रवास करायचा. गाडीला बांधलेला पेटता कंदील बघून वन्य प्राणी, भूताटकी, दुष्ट शक्ती गाडीजवळ येत नाहीत, अशी त्याची धारणा होती. एकंदरीत त्या काळात कंदील हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होता.
आम्ही दापोलीत एक कौलारू घर विकत घेतले तेव्हा आधीच्या मालकाने घरातले त्याचे सर्व सामानसुमान इतरत्र हलवले तरी एक जुनाट कंदील तसाच पोटमाळ्यावरच्या पाष्टाच्या वाशाला अडकवून ठेवला होता. घराची साफसफाई करताना तो कंदील पाहिल्यावर मला खूप आनंद झाला. आजही तो कंदील मी पोटमाळ्यावर ‘जपून’ ठेवला आहे. आजवर अनेक विषयांवर लिखाण झाले, मात्र कंदिलावर लिहायचे तसे राहून गेले होते. ‘कोमसाप’च्या ‘मधुघट’ भागाने तेही कार्य सिद्धीस नेले. यानिमित्ताने मी अनेकवेळेस माझ्या विद्यार्थ्यांना शिकवलेल्या वि. म. कुलकर्णी यांच्या एका प्रसिद्ध कवितेतील काही ओळी अगदी आपसूकच माझ्या ओठांवर आल्या,
‘‘काचेचा मग महाल तो
कुणी बांधुनी मज देतो
कंदील त्याला जन म्हणती
मीच तयांतिल परि ज्योती...!’’
- बाबू घाडीगावकर, जालगाव, दापोली.