माणूस हा काही संकल्पनांवर अवलंबून असतो. आयुष्य जगताना लागते ‘ती प्रेरणा,’ ‘ती इच्छा,’ ‘ती आकांक्षा,’ ‘ती जिद्द,’ ‘ती मेहनत,’ कमाल आहे; पण सत्य आहे. बघायला गेलं तर व्याकरणातही ह्या आयुष्य उभारणाऱ्या सूत्रांना स्त्रीलिंगी स्थान दिलं गेलं आहे. का बरं? कारण त्यानेही मान्य केलं आहे. एका स्त्रीच महत्त्व. जिथे विश्वाने तिची निर्मिती केली तिथे आपण कोण हो तिचं महत्त्व तोलण्यासाठी उभे राहणारे?
कायमच आपल्यासमोर येते ती समाजातील किंवा समाजापलीकडील स्त्री; पण एवढ्या जवळ असलेली समाजाच्या अलीकडील स्त्री ही पारंपरिक म्हणून काहीशी रूढीजमा झाली आहे. कोणतीही स्त्री प्रथम आपल्या कुटुंबाची असते आणि मग आपल्या कर्तृत्वावर झेपावणारी समाजासाठीची असते; तर एक सुंदर आणि निष्पाप फूल जन्माला येते तेव्हा प्रथम उगवते ती कळी. ती कळी म्हणजे ‘मुलगी.’ संपूर्ण घराला आपल्या लडिवाळपणाने मोहिनी घालणारी ती एक सुखद आनंद देऊन जाते. मग असते एक ‘मैत्रीण,’ जी आपल्याला प्रगल्भ बनविते. ती ‘प्रेयसी’ होते तेव्हा ती भावना समजावते. ‘सहचारिणी’ होते तेव्हा ती नावाप्रमाणेच सोबती होते. तिची बढती जेव्हा आईमध्ये होते तेव्हा ती ‘माया’ देते, आपल्याला जन्म देते. ती आजी म्हणून समोर येते तेव्हा संस्कारांची ‘खाण’ आपल्याला गवसते. या आणि याहून ही अनेक रूपांतून ती आपल्यासाठी असलेली एक आपली ‘ताकद’ असते. या सगळ्याजणी आपल्यासमवेत असल्या तरी कोणतेही संकट हे आपल्या कर्तृत्वासमोर मोठं नसेल.
‘दिवा’ हा केवळ एका दिशेला प्रकाश देतो; पण समई ही अनेक दिशा उजळवून टाकते. तसेच महिला ही कोणत्याही एका बाजूने विचार करून पुढे नाही जात; तर आपल्यासमवेत सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याचा एक समभाव तिच्या अंगी असतो. मेणबत्ती ही स्वत: जळते; पण दुसऱ्यांना अंधारापासून अलिप्त करते, तशी असते स्त्री. जी स्वत: झटते, स्वत: कष्ट करते; पण दुसऱ्यांना दु:खाची सलही लागू देत नाही. अनेक बातम्यांतून वाचलं असेल आपण, ‘कर्जाचे ओझे होऊन केली शेतकऱ्याने आत्महत्या.’ कधी ऐकलं आहे का? शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केली आहे असं नाही. ही सहनशीलता आणि परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य असतं ते एका स्त्रीमध्येच. संपूर्ण घराचा डोलारा सांभाळणं खूप क्लिष्ट काम असतं; पण अगदी सहजरीत्या तिच्या हातून ते घडत असतं. मला वाटतं की आज समाजात जे भावनांना मूल्य आहे ते स्त्रीमुळेच.
आजची स्त्री ही ‘धाडसी’ आहे. कर्तृत्ववान आहे. आपल्या पायावर उभी आहे. सर्व क्षेत्र व्यापून हे विश्वची माझे स्थान तिने निर्माण केले आहे. म्हणूनच तिचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. इंग्रजांनी आपल्या भारतातील सोन्याची लूट केली असं म्हणतात; पण जर स्त्रीमध्ये असलेलं हे सोनं जर आपण परखलं तर त्या इंग्रजांपेक्षा कितीतरी पटींनी आपला ‘भारत’ देश समृद्ध झालेला दिसेल. तसे पाहायला गेले तर एकीकडे स्त्रीशिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते. पुरुषही तिचा भार कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत; तर दुसरीकडे अजूनही मुलगी नको हा घोष सुरू आहे. ‘मुली’ म्हणजे उपभोगाचं साधन म्हणूनदेखील पाहिले जाते आहे. ही महिलांबाबतची दुटप्पी वर्तणूक निश्चितच कुठेतरी थांबेल ही एक ‘आशा’ आहे आणि त्यानंतर पुन्हा अशीच आपल्या ‘कर्तृत्वाची’ व ‘यशाची गुढी’ घेऊन महिला आपला प्रवास चालू ठेवतील, यात काही शंकाच नाही.
- जुहिका शेट्ये, वाकेड, लांजा