खेड : तालुक्यातील कुळवंडी येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारून हा अड्डा उद्ध्वस्त केला आणि ३ लाख १७ हजार रकमेचा माल जप्त केला.राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हातभट्टी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी अवैध दारूविरोधात मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, कुळवंडी येथे हातभट्टी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.
यानुसार विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक खेड, भरारीपथक व चिपळूण विभागाच्या कार्यालयाने संयुक्तपणे छापा टाकला. यावेळी गावठी दारू व रसायन असा मिळून एकूण ३ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारू निर्मितीसाठी लागणारे १२७०० लीटर रसायन व ७० लीटर तयार हातभट्टीची दारू सापडली.ही कारवाई खेडचे निरीक्षक शंकर जाधव, चिपळूण व भरारी पथक कार्यालयातील निरीक्षक, उपनिरीक्षक व जवान यांनी मिळून केली आहे. या गुन्ह्याच्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे कोणतीही नसल्याने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.