रत्नागिरी, दि. ४ : आॅक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून दर दिवशी सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात घरे, गोठे यांच्या पडझडीबरोबर मंडणगड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये घरांवर तसेच पाळीव जनावरांवर वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यात लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
मंडणगड तालुक्यात पणदेरी येथील शांताराम शिवगण यांच्या घरावर वीज पडून नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात तीन घरांची अशंत: पडझड झाली. तसेच गुढे येथील शिवाजी पानवकर आणि मजरेकोंडर येथील वसंत नवरस यांच्या घरांवर वीज पडून नुकसान झाले. संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथील शिवाजी जाधव यांची तीन गुरे विजेचा शॉक लागून दगावली. पर्शराम येथील भिवा कारंडे यांच्या घरावर वीज पडल्याने नुकसान झाले. शंकर खेडेकर यांच्या घरावरही वीज कोसळली.तालुक्यातील १३ घरांची पडझड झाल्याने नुकसान झाले. लांजा तालुक्यातील तळवडे येथे गाईवर तर वाडगाव येथे बैलावर वीज पडल्याने ही ही जनावरे मृत झाली आहेत. राजापूर तालुक्यातील माडबन येथील सुर्यकांत मांजरेकर, नवनाथ वाघमारे यांच्या घरावर वीज पडून नुकसान झाले आहे.