रत्नागिरी : फिरायला गेलेल्या वृद्धेला पोलिस असल्याची बतावणी करून सुमारे २ लाख ५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर तीन अज्ञातांनी डल्ला मारला. स्मिता जनार्दन पावसकर (६९, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) असे या वृद्धेचे नाव असून, तिला लुबाडणाऱ्या तिघांविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर वृत्त असे, पावसकर या रविवारी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे फिरायला निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांचे दीर परकार हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्यामुळे त्या त्यांना पाहण्यासाठी गेल्या. त्या वीस मिनिटांतच पुन्हा परकार हॉस्पिटलमधून आरोग्य मंदिर ते मजगाव रोडवरून घरी जाण्यास निघाल्या. त्या नार्वेकर बिल्डिंग येथे आल्या असता, दोघा अज्ञातांनी त्यांच्याशी आपण पोलिस असल्याची बतावणी केली. ‘पुढे खून झाला आहे. त्यामुळे तुम्ही अंगावर दागिने घालून फिरू नका, तुमचे दागिने आमच्याकडे काढून द्या’, असे त्यांनी पावसकर यांना सांगितले. त्या दोघांनी समोरून जाणाऱ्या एका व्यक्तीला बोलावले व त्यालाही असेच सांगून त्याच्याकडील दागिने मागून घेतले. त्याने ते दिल्यामुळे पावसकर यांचाही त्यांच्यावर विश्वास बसला. त्यांनीही आपल्याकडील पाटल्या, बांगड्या, चेन, माळ असा ८ तोळे २०० ग्रॅम वजनाचे सोने सुमारे २ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी त्या दोघांच्या हातात दिला. त्या दोघांनी ते कागदाच्या पुडीत बांधून पावसकर यांच्या पिशवीत टाकले. तोतया पोलिसांनी बोलावलेली व्यक्ती त्यांच्यातील असावी, असे पोलिसांनी सांगितले.दरम्यान, स्मिता यांनी घरी जाऊन ती पुडी उघडून पाहिली असता त्यामधील दागिने लंपास झाले होते. पुडीत बांगड्याच्या आकाराच्या इलेट्रीक वायरी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठून त्या तोतया पोलिसांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
तिघा भामट्यांकडून वृद्धेचे दोन लाखांचे दागिने लंपास
By admin | Published: January 29, 2017 11:22 PM