मेहरून नाकाडे
रत्नागिरी : गणेशमूर्ती रेखाटण्याचे काम तसे दाेन - तीन महिने सुरू असते; पण रत्नागिरी शहरात असाही गणपती आहे जाे ‘एका दिवसात घडताे आणि एका दिवसात रंगताे’. हा गणपती नवसाला पावताे, अशी भाविकांची धारणा असून, ‘लाल गणपती’ नावाने ताे प्रसिद्ध आहे. शहरातील शेट्ये घराण्यात ‘लाल गणपती उत्सव’ गेली सात पिढ्या सुरू आहे.शेट्ये घराण्यातील सातव्या पिढीचे अनिकेत गजानन शेट्ये हे लाल गणपतीचा उत्सव साजरा करत आहेत. या उत्सवामध्ये शेट्ये घराण्याच्या माहेरवाशिणींचे कुटुंब असणारे रेडीज, मापुस्कर, धामणस्कर, बेंडके, पाथरे, हेळेकर, वणजू सहभागी होतात. सोयर-सुतक आले तरी गणपती आणावाच लागतो आणि त्याची पूजा माहेरवाशिणींच्या परिवाराकडून करून घेण्याची प्रथा आहे.लाल गणपतीची मूर्ती बनविण्याचा दिवस व घडवणारे मूर्तिकार शिवा दत्तात्रय पाटणकर यांची सहावी पिढी आहे. नागपंचमीच्या दिवशी शेट्ये घरातील व्यक्ती गणपतीचा पाट सकाळी ९ वाजेपर्यंत पाटणकर यांच्याकडे देतात. त्याची विधिवत पूजा करून पाटणकर गणपती बनविण्यास सुरुवात करतात.
गणपतीची माती पाटणकर घराण्यातील मुख्य स्त्री स्वत: मळते. नागपंचमीच्या दिवशी रात्री ९ वाजेपर्यंत मूर्ती तयार होते. गणपतीच्या आदल्या दिवशी मूर्तीचे रंगकाम करण्यात येते. मूर्तीचा रंग रक्तचंदनासारखा तांबडा आहे. पाटणकर घराण्याचीही एक परंपरा आहे. ज्या दिवशी त्यांचा मुलगा हा गणपती पूर्ण करेल त्या दिवशी त्यांच्या वडिलांनी तो गणपती तयार करायचा नाही. इतकी वर्षे झाली; पण ही प्रथा चुकलेली नाही. लाल गणपतीला डोळे हे मातीमध्ये चांदीचे लावण्यात येतात.गाैरी-गणपती विसर्जनाला लाल गणपतीचे विसर्जन होते. या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीबरोबर संपूर्ण तेलीआळीतील सर्व गणपती विसर्जनासाठी बाहेर पडतात. शेट्ये घराण्यातील व्यक्ती ताशा किंवा बॅण्ड घेऊन गणपती आणण्यासाठी तेलीआळीत गेल्यानंतर सर्व गणपती विसर्जनासाठी बाहेर काढले जातात. आजही ही परंपरा सुरू आहे. उत्सवाच्या सांगतेला १०८ पुरणाच्या मोदकाचा नैवेद्य अर्पण केला जातो.डाव्या सोंडेचा बाप्पालाल गणपतीचे रूप हे भाद्रपद महिन्याच्या विनायक चतुर्थीला जन्म घेतलेले आहे. त्याचा रक्तवर्ण आहे. तो प्रत्यक्ष पाटावर येऊन बसलेला आहे. त्याला मातीची बैठक नसते. तो डाव्या सोंडेचा आहे. कानात कुंडले, पिवळे पीतांबर, हिरवा शेला परिधान केलेला बाप्पा आहे. मूर्ती उभी राहिली तर उंची साडेतीन फूट होईल, अशी रचना आहे. पावले लहान बाळासारखी आहेत.