संदीप बांद्रेचिपळूण : तालुक्यातील कोकरे-घाणेकरवाडी येथे दोन वर्षांपूर्वी खुदाई केलेल्या बोअरवेलला लागलेले गरम पाण्याचे झरे आजही निरंतर प्रवाहित आहेत. पावसाळ्याच्या दिवसांतही या बाेअरवेलमधून गरम पाणी वाहत आहे. ही बाेअरवेल तरुणांसह पर्यटकांनाही आकर्षित करू लागली आहे. अनेक जण या परिसरात स्नानाचा आनंद लुटत आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणाचा विकास झाल्यास पर्यटक येथे भेटी देतील, अशी आशा जमीन मालक संजय परशुराम दळवी यांनी व्यक्त केली आहे.संजय दळवी यांनी घर बांधण्यासाठी कोकरे-घाणेकरवाडी येथे जमीन खरेदी केली होती. या जमिनीमध्ये ३० मार्च २०२१ रोजी ते बोअरवेल मारत होते. जवळपास १२० फुटांवर खुदाई करताच पाणी लागले. मात्र, भविष्यात ते पाणी अपुरे पडू नये यासाठी पुन्हा १५ फुटांवर खोल त्यांनी खुदाई केली. हे काम सुरू असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास या बोअरवेलमधून उकळते गरम पाण्याचे फवारे बाहेर पडू लागले. जमिनीपासून सुमारे ५ ते ७ फूट उंचीपर्यंत ६ इंची पाइपमधून कूपनलिकेतून गरम पाणी वाहू लागल्याचे समजताच संजय दळवी आणि उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी याठिकाणी भेट दिली. शासकीय अधिकारी व भूगर्भ शास्त्रज्ञ यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. मात्र, या बाेअरवेलला गरम पाणी कसे लागले, याचा उलगडा अजून झालेला नाही.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली व राजवाडी, दापोली तालुक्यातील उन्हवरे येथे गरम पाण्याची कुंडे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या कुंडांमध्ये गरम पाण्याचा प्रवाह अखंडपणे वाहत आहे. संजय दळवी यांच्या बोअरवेललाही अशा प्रकारेच गरम पाण्याचे झरे आजही निरंतर वाहत आहेत. दळवी कुटुंबीय या शेतजमिनीत घर बांधणार होते. मात्र, येथे गरम पाण्याचे झरे लागल्याने त्यांनी हा निर्णय बदलला आहे.
गेली दोन वर्षे संजय दळवी यांच्या जमिनीतील बोरअवेलच्या पाण्यात येथील तरुण व ग्रामस्थ स्नान करीत आहेत. या पाण्याचा कोणालाही कसलाही त्रास झालेला नाही. याठिकाणी पर्यटनदृष्ट्या विकास केल्यास हे पर्यटनस्थळ म्हणून उदयाला येईल. -महेंद्र दळवी, ग्रामस्थ, कोकरे.