दापोली : बंद घरातील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे साेन्याचे दागिने व राेख रक्कम असा ऐवज लंपास केल्याची घटना दापाेली तालुक्यातील आंजर्ले येथे ५ जुलै राेजी सायंकाळी ७ ते ८ जुलै राेजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी विलास दत्ताराम म्हामनकर (रा. भंडारवाडा - आंजर्ले) यांनी फिर्याद दिली आहे.
विलास दत्ताराम म्हामनकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे भंडारवाडी - आंजर्ले येथे स्वतःच्या मालकीचे घर आहे. ते व्यवसायानिमित्त गिरगाव मुंबई येथे राहतात. त्यांच्या घराचा दरवाजा अज्ञाताने उघडून आतील लाकडी कपाटातील लॉकर तोडून दोन लाख रुपये किमतीच्या शंभर ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे ७२ ग्रॅम वजनाचे दुसरे मंगळसूत्र, १ लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार, १० हजार रुपये किमतीची सोन्याची नथ व २७ हजार रुपये रोख असा चार लाख ८१ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
या चाेरीच्या घटनेनंतर रत्नागिरी येथून ९ जुलैला श्वानपथक आंजर्ले येथे दाखल झाले हाेते. श्वान घराच्या मागील बाजूकडून ५० मीटर पूर्वेकडे गेले. तेथून ५० मीटर दक्षिणेकडे गेले तेथून पश्चिमेकडे समुद्रकिनारी जाऊन घराकडे परत आले. या पथकात हेड कॉन्स्टेबल संभाजी घुगरे, पोलीस नाईक जीवन जाधव व श्वान माही यांचा समावेश होता. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम. एम. धोंडे हे करीत आहेत.