राजापूर : सामाईक जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने धारदार सुऱ्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना राजापूर तालुक्यातील कशेळी - सावरेवाडी येथे गुरूवारी दुपारी घडली. या घटनेत शांताराम जानू ठुकरूल (७५) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी महादेव जानू ठुकरूल (५८) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव ठुकरूल व शांताराम ठुकरूल या दोन भावांमध्ये सामाईक जमिनीच्या वाटपावरून गुरूवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वाद सुरू झाला. या वादातून महादेव ठुकरूल याने शांताराम ठुकरूल यांच्यावर धारदार सुऱ्याने वार केले. यामध्ये शांताराम ठुकरूल हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत उत्कर्ष अरविंद ठुकरूल यांनी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेनंतर महादेव ठुकरूल याने जंगलात पळ काढला होता. मात्र, नाटे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांनी उपनिरीक्षक विवेक साळवी, हवालदार प्रसाद शिवलकर यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या मदतीने जंगलात पळालेल्या महादेव ठुकरूल याला ताब्यात घेतले.