खेड : दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील अस्तान धनगरवाडी येथे भूस्खलनामुळे दरड कोसळून रस्तावर आल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. तब्बल १२ तासांनी रस्त्यावरील माती हटवून रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे.१८ गाव बांदरी पट्ट्यात असणाऱ्या अस्तान- धनगरवाडी येथे डोंगरावर भूस्खलन झाले आणि मोठी दरड मुख्य रस्त्यावर कोसळली. त्यानंतर या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले आहे. अस्तान गावासोबतच वडगाव, बिरमनी ही गावेही दरडग्रस्त गावे असून या भूस्खलनामुळे परिसरात घबराट पसरली आहे.तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत याच गावाशेजारी असणाऱ्या परिसरात दरड कोसळून दोन जणांचा जीव गेला होता. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात पहिली आपत्तीची घटना घडली आहे. मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्याने बांदरी पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क सोमवारी मध्यरात्रीपासून तुटला होता. मात्र सकाळपासून जेसीबीद्वारे काम केल्यानंतर १२ तासांनी दरड हटवण्यात आली असून, वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
Ratnagiri: अस्तान येथे दरड कोसळली, तब्बल १२ तासांनी वाहतूक पूर्ववत सुरू
By मनोज मुळ्ये | Published: June 11, 2024 6:15 PM