चिपळूण : मुंबई-गोवामहामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून या चौपदरीकरण अंतर्गत परशुराम घाटात डोंगर कटाई व सपाटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या कामांतर्गत यापूर्वी डोंगरकटाई करताना मोठे दगड पेढे येथे वस्तीत कोसळून नुकसान झाले होते. तर आज, गुरुवारी सकाळी परशुराम घाटात दरड कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, काही वेळ वाहतूक खोळंबली होती.गेल्या काही महिन्यांपासून परशुराम घाटात डोंगरकटाई व सपाटी करणाबरोबरच रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ही कामे सुरू असताना पेढे वस्तीत दगड कोसळण्याच्या सलग घटना घडल्या होत्या. त्यामध्ये काहींच्या घरांचे नुकसान झाले होते. गुरुवारी सकाळी पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली. ही दरड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. नंतर ठेकेदार कंपनीने जेसीबी व पोकलेनच्या साह्याने ही दरड बाजूला केल्याने वाहतूक पूर्ववत झाली. मात्र दरडी रस्त्यावर येत असल्याने वाहन चालकांमध्ये भीतीची वातावरण आहे.पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटातील काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी यंत्रणा वाढविण्यात आली असून अहोरात्र काम सुरु ठेवले आहे. याआधी घाटात वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. संपूर्ण पावसाळ्यात घाट बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता घाट सुरूच ठेवून काम केले जात आहे. हे काम सुरु असतानाच गुरुवारी दरड कोसळली. त्यातून काही दगड रस्त्यावर आले. मात्र ठेकेदार कंपनीच्या यंत्रणेने तातडीने दगड व माती हटवून मार्ग मोकळा केला.
Ratnagiri News: परशुराम घाटात दरड कोसळली; काही वेळातच वाहतूक पूर्ववत
By संदीप बांद्रे | Published: February 02, 2023 12:49 PM