राजापूर - कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील ओणी पचल अणुस्कूरा मार्गावरअणुस्कूरा घाटात बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेच्या दरम्यान दरड कोसळली आहे. त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णतः बंद होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे ही दरड बाजूला करत सकाळी घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
गेले काही दिवस सर्वत्र मुसळधार पाउस पडत असून अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. या पावसाचा परिणाम म्हणूनच आज अणुस्कुरा घाटात बुधवारी मध्यरात्री ते गुरुवार पहाटेच्या दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती कळताच राजापूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्ग सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले असून गुरुवारी सकाळी घाटातील दरड काही प्रमाणात हटवण्यात आली. आता एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वप्नील बावधनकर यांनी दिली आहे. मात्र नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.