रत्नागिरी : गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. रेल्वे मार्गावरील विलवडे (ता. लांजा) येथे रुळावर आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान दरड कोसळली. यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. या मार्गावरील गाड्या दीड ते दोन तास उशिराने धावत होत्या.जिल्ह्यात दोन दिवस पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. तर महामार्ग चिखलमय झाला आहे. मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी - लांजा दरम्यान विलवडे येथे शुक्रवारी सकाळी रुळावर दरड कोसळली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या मार्गावरुन धावणाऱ्या सर्वच गाड्या उशिराने धावत होत्या. रुळावर आलेली दरड बाजूला करण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत गाड्या नजीकच्या रेल्वे स्थानकावर थांबून ठेवण्यात आल्या होत्या.दरड बाजूला करण्याचे काम सुरु असताना सावंतवाडी - दिवा गाडी विलवडे रेल्वे स्थानक, राजधानी एक्स्प्रेस निवसर रेल्वे स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती. रेल्वे रुळावर आलेली माती आणि दरड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे.
पावसाचा फटका; कोकण रेल्वे मार्गावर कोसळली दरड, वाहतूक विस्कळीत
By अरुण आडिवरेकर | Published: October 07, 2022 5:04 PM