लांजा
: दोन दिवस वादळीवाऱ्यासह अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर लांजा तहसीलदार समाधान गायकवाड यांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे. नदीकिनारी तसेच दरडग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या नोटीस देण्यात आल्या असून, शुक्रवार व शनिवारी लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लांजा महसूल विभाग सतर्क झाला आहे. जेथे पूर येण्याची शक्यता आहे किंवा जेथे दरडी कोसळण्याची शक्यता आहे, अशा गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. या सर्व लोकांची तात्पुरती निवारा केंद्राची सोयही प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मंडल अधिकारी, तलाठ्यांनाही लोकांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही अडचण आल्यास तत्काळ तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही तहसीलदार गायकवाड यांनी केले आहे.