अरुण आडिवरेकररत्नागिरी : जिल्ह्यात थर्टी फर्स्टचा जल्लोष साजरा होताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग दक्ष झाला आहे. पोलिसांची गस्ती पथके तैनात असून, राज्य उत्पादन शुल्क विभागानेही जिल्ह्यात चार पथके तैनात ठेवली आहेत. मुंबई - गोवा महामार्गावरही गस्त ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पार्टीचा मूड कायम ठेवायचा असेल तर थोडी सावधगिरी बाळगावीच लागेल.
उत्पादन शुल्कची १३ रिसॉर्ट, हॉटेलला नोटीसज्यांच्याकडे मद्य परवाने नाहीत, अशा जिल्ह्यातील १३ रिसोर्ट व हॉटेल्सना राज्य उत्पादन शुल्क खात्याने नोटीस बजावली आहे. यामध्ये दापोलीतील हॉटेल्सचे प्रमाण जास्त आहे. एक दिवसीय पार्टीचा परवाना घेतल्याशिवाय हॉटेल्समध्ये मद्याची पार्टी करता येणार नाही, अशी सणसणीत तंबीच उत्पादन शुल्क खात्याकडून देण्यात आली आहे.
दोन महिन्यांत १३ जणांना दंडजिल्ह्यातील सहा अवैध हॉटेल व धाब्यांवर कारवाई करण्यात आली असून, १३ जणांना न्यायालयाने शिक्षा म्हणून ६२ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
पथके ठेवणार काटेकोर लक्षमद्य वाहतुकीला आळा घालण्यासाठी चार पथके तैनात केली आहेत. मंडणगड - दापोली, चिपळूण - गुहागर, रत्नागिरी - संगमेश्वर, लांजा - राजापूर येथे पथके तैनात असतील.
हॉटेल, ढाब्यावर ‘बसू’ नकाथर्टी फर्स्ट साजरा करताना ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये बसून दारू पिणाऱ्यांवर लक्ष राहणार आहे. दाब्यावर दारू पिणाऱ्यांबरोबरच त्यांना दारू उपलब्ध करून देणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल करून अटक होणार आहे. परवान्याशिवाय कोणीही दारू पिऊ नये.पोलिस काय करणार?
- प्रत्येक पोलिस ठाणे हद्दीत जल्लोष कार्यक्रमांवर नजर ठेवण्याकरिता विशेष गस्ती पथके.
- मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर लक्ष देण्यासाठी साध्या वेशातील पोलिस पथक.
- ब्रीथ ॲनालायझर यंत्राद्वारे चाचणी करून मद्यपी चालकांवर कायदेशीर कारवाई करणार.
- ३१ डिसेंबर तसेच १ जानेवारी यादिवशी जल्लाेष कार्यक्रम ठिकाणांवर व्हिडीओग्राफी पथकाद्वारे नजर ठेवणार.
- विदेशी पर्यटक महिला तसेच परराज्यातील महिलांची छेडछाड होणार नाही, याकडे महिला पथकांद्वारे विशेष लक्ष ठेवणार.
- जिल्ह्यातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी विविध ३४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
- सोशल मीडियावरील अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्टवर सायबर पोलिस स्थानकाची करडी नजर राहणार.
कायद्याच्या बंधनांचे तसेच वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन व पवित्र स्थळांचे जसे समुद्रकिनारे, गडकिल्ले, मंदिरे यांचे पावित्र्य अबाधित राखण्याकरिता दक्षता घ्यावी. सभ्यतेचे वर्तन ठेवून रत्नागिरी पोलिस दलाला सहकार्य करावे. - धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी.
जनतेने नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करावे. परंतु कायदा, सुव्यवस्था बिघडणार नाही, याकडे लक्ष द्यावे. अवैध मद्यविक्री, वाहतूक, हातभट्टीच्या दारूची विक्री याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करावी. - सागर धोमकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, रत्नागिरी.