चिपळूण : येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एनसीसी विभागाने शहरामध्ये ‘प्लास्टिक बाटलीमुक्त शहर’ अभियान सुरू केले आहे. या अभियानादरम्यान शहरातील प्लास्टिक बाटल्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
अख्ख्या चिपळूण शहराला दि. २२ व २३ जुलै रोजी भयंकर महापुराचा सामना करावा लागला. या महापुरामुळे शहरभर मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या संपूर्ण शहरात पाठविण्यात आल्या. महापुराची परिस्थिती ओसरल्यानंतर आता याच बाटल्या रस्त्यावर येत आहेत आणि कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे.
या प्लास्टिक बाटल्या गटारांमध्ये साचत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही बाटल्या पाण्याच्या प्रवाहासोबत नदीद्वारे समुद्रात पोहोचतात व विविध समुद्री जीवांना हानी पोहोचते. हे सर्व टाळण्यासाठी या बाटल्या जमा करून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. याच उद्देशाने डीबीजे महाविद्यालयाने या उपक्रमाला सुरुवात केली आहे. बुधवारपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमादरम्यान चिपळूण शहरातील विविध भागात जाऊन डीबीजेचे विद्यार्थी या प्लास्टिक बाटल्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावली जाईल, याची दक्षता घेणार आहेत. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील व इमारत परिसरातील बाटल्या जमा करून ठेवाव्यात व विद्यार्थी आल्यानंतर त्यांच्याकडे सुपूर्द कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.