पाली : मुंबई-गोवा महामार्गावर चरवेली येथील तीव्र उतारावर मॅक्स मोटार नाल्यात उलटून आठजण जखमी झाले. आज सकाळी ८.२० च्या दरम्यान हा अपघात झाला. यातील दोघींना जोराचा मार लागला आहे. अन्य सहा जण किरकोळ जखमी आहेत.मुंबईतील लवेकर व पऱ्याची आळी रत्नागिरी येथील कुष्टे कुटुंबीय असे आठजण मॅक्स गाडीतून (एमएच०८-ए-९९८१) या रत्नागिरीहून लांजा येथे चालले होते. सुनील श्रीधर कुष्टे गाडी चालवत होते. मुंबई-गोवा महामार्गावर चरवेली येथील उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने व स्टेअरिंग लॉक झाल्याने मोटार कडेच्या नाल्यात उलटली. त्यात आठजण जखमी झाले.जखमींची नावे अशी-पुजा सुनील कुष्टे (२७), सुलभा श्रीधर कुष्टे (८०), राधिका सुनील कुष्टे (४५), श्रेयस सुनील कुष्टे (१४), ज्योती विकास लवेकर (४९), विकास विश्वनाथ लवेकर (५९), दीपश्री दिलीप धामणकर (५४), वेदांग विकास लवेकर (२१).अपघाताची कल्पना मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी आली. त्यातून सर्व जखमींना रत्नागिरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे स्वरूप भिषण होते.
कार पूर्ण उलटली होती. त्यामुळे गाडीतील प्रवाशांत हाहाकार उडाला. आजूबाजूचे लोक मदतीला आले. त्यांनी सर्वांना गाडीबाहेर काढले. त्यानंतर त्यांना संस्थानच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. पुजा व सुलभा कुष्टे यांना जास्त मार लागला आहे. अन्य सहा जण किरकोळ जखमी आहेत.