लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : तालुक्यातील देवघर येथील १८ वर्षीय अथर्व जितेंद्र गाेंधळेकर हा सायकलवरून घरातून बाहेर पडला. सायंकाळी उशिरापर्यंत ताे घरी न आल्याने आई-वडिलांचा जीव मात्र काळजीने कासावीस झाला. काेठेही त्याचा पत्ता न लागल्याने त्यांनी गुहागर पाेलीस स्थानकही गाठले आणि शुक्रवारी सकाळी अथर्व गुजरातमधील द्वारकेत सुखरूप असल्याचा फाेन आला आणि त्याच्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. कृष्णभक्तीपाेटीच ताे तिथंपर्यंत पाेहाेचल्याचे सांगण्यात येत आहे.
देवघर भाग्यनगर येथे राहणारे जितेंद्र रामदास गोंधळेकर सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. सध्या ते आरजीपीपीएल वसाहतीच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अथर्व हा बारावीत शिकत आहे. ३१ मार्चला सकाळी अथर्व सायकल घेऊन घराबाहेर पडला. काही तास परत न आल्याने आजूबाजूला मित्राकडे किंवा अन्य ठिकाणी गेला आहे का, याचा शोध घेण्यात आला. रात्री उशिरा गुहागर पोलीस स्थानकात अथर्व बेपत्ता असल्याची तक्रार नाेंदविण्यात आली. अथर्व हा कृष्णभक्त आहे. लहानपणापासून त्याला जप करणे, धार्मिक ग्रंथ वाचणे याची ओढ आहे. त्याचे मन कृष्णभक्तीत रमत असल्याने अनेक वेळा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन जप करण्याची त्याची सवय लक्षात घेऊन त्याची पोथी जपाची माळ आदी साहित्य सोबत घेऊन गेल्याचे घरच्यांच्या लक्षात आले.
शुक्रवारी सकाळी अचानकपणे द्वारका (गुजरात) येथील इस्कॉन मंदिर व्यवस्थापनाने अथर्वच्या घरी फोन करून ताे सुखरूप असल्याचे सांगितल्यानंतर अथर्वच्या आई-वडिलांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. याबाबत गुहागर पोलीस स्थानकात माहिती देण्यात आली. तातडीने अथर्वला घरी आणण्यासाठी आई-वडील व नातेवाईक द्वारका गुजरात येथे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. याबाबत गुहागर पोलिसांशी संपर्क साधला असता प्रथमदर्शनी कृष्णभक्तीत अथर्व घरातून बाहेर पडला असल्याचे दिसून येत असले तरी प्रत्यक्ष आल्यानंतर नक्की कारण स्पष्ट होईल, असे सांगितले.
चाैकट
गुगलवरून सर्च
अथर्वला लहानपणापासून कृष्ण भक्तीची गाेडी लागलेली आहे. ताे कायम कृष्णाच्या भक्तीत तल्लीन हाेऊन जाताे. त्याने घरातून बाहेर पडणाऱ्यापूर्वी गुगलवरून द्वारकेचे ठिकाण शाेधले हाेते. त्याचबराेबर त्याने तिथपर्यंत जाण्याचा मार्गही पाहिला हाेता. त्यामुळे तिथे गेल्याचा अंदाज बांधण्यात आला हाेता.