लसीकरणाची मागणी
चिपळूण : शहरातील ५० हजार नागरिकांना मोफत घरोघरी जाऊन कोरोना लसीकरण करण्याची मागणी शहर राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांच्याकडे याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करूनही नागरिकांना वेळेवर लसीकरण होत नसल्याने गैरसोय झाल्याचे निदर्शनास आणले आहे.
लसीकरण कार्यक्रम जाहीर
दापोली : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, जिल्ह्यासाठी ६,७०० डोस उपलब्ध केले आहेत. दापोली तालुक्यातील आसूद, केळशी, दाभोळ, उंबर्ले, पिसई, साकळोली, फणसू, आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात हे लसीकरण होणार आहे.
परताव्याची मागणी
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळ, तसेच कोरोना व वातावरणातील बदलांमुळे या वर्षी मासेमारीसाठी कमी कालावधी मिळाला. मच्छीमारांना डिझेल परताव्यासाठी ४८ कोटींची प्रतीक्षा असून, काही महिन्यांपूर्वी आठ कोटी मिळाले होते. सध्या आर्थिक साहाय्याची गरज असल्याने परतावा तातडीने मच्छीमारांना प्राप्त होणे आवश्यक आहे.
भोसले यांची निवड
खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कळंबट जिल्हा परिषद गटविभाग अध्यक्षपदी प्रताप भोसले यांची निवड करण्यात आली आहे. राज्य सरचिटणीस तथा खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी भोसले यांची निवड जाहीर केली असून, त्यांना नियुक्तिपत्र दिले आहे. यावेळी चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, उपतालुकाध्यक्ष अभिनव भुरण उपस्थित होते.
पाणीपुरवठा सुरु
दापोली : आंजर्ले गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या खुटीचे पाणी या ठिकाणी पाण्याच्या पाइपला मारलेल्या जाॅइंटवर अज्ञात व्यक्तीने दगड मारून पाइप फोडला होता. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा बंद झाला होता. मात्र, आता तो सुरू करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने नासधूस केल्याबद्दल दापोली पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे.
चारसूत्री लागवड प्रात्यक्षिक
चिपळूण : तालुक्यातील नागावे येथील दत्ताराम वीर यांच्या शेतात शेतकऱ्यांना चारसूत्री भातलागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. अधिक भात उत्पादनासाठी चारसूत्री पद्धतीचा अवलंब करून अधिक उत्पादन घ्यावे, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी केले.
सुरुची लागवड
रत्नागिरी : अनुलोम प्रेरित जनसेवा समाजिक मंडळातर्फे वायंगणी येथील समुद्रकिनारी १०० सुरुची रोपे लावण्यात आली. यावेळी मंडळाचे प्रमुख व गोळप ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश काळे यांनी सुरु लागवडीतून किनाऱ्याची धूप थांबविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. वायंगणी बिच येथे पर्यटनातून रोजगारवाढीसाठी याची मदत होईल, असे स्पष्ट केले.
सभासद यादी प्रसिद्ध
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नवीन सभासद नोंदणी तयार करण्याविषयक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर केलेल्या आदेशाचा मान ठेवत, न्यायिक आदेश होण्यापूर्वी नव्या सभासदांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे उपकार्याध्यक्ष अॅड.विजय साखळकर यांनी दिली.