चिपळूण : येथील सध्या गाजत असलेल्या सावकारीचे केंद्रबिंदू गोवळकोट रोड असून, त्याचे धागेदोरे छत्तीसगड, गुजरात आणि मुंबईपर्यंत असल्याची चर्चा आहे. चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात या बेकायदा सावकारीची पाळेमुळे घट्ट झाली असून, ती समूळ नष्ट करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सक्शन पंपाने वाळू उत्खनन
दापोली : तालुक्यातील खाडीपट्ट्यात फरारे येथे बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरु आहे. मागील १५ दिवसांपासून ३ सक्शन पंपांनी वाळूचा उपसा सुरु आहे. दापोली तालुक्यात खाडीपात्रात पडलेल्या खड्ड्यावरुन बेकायदेशीर वाळू उपसा करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
भातपीक स्पर्धेत प्रथम
रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती आणि गोळप गावातील प्रगतशील शेतकरी मंगेश साळवी यांनी कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या भातपीक स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. गत हंगामात ही स्पर्धा घेण्यात आली होती.
दोन दुकानदारांवर कारवाई
खेड : खेड शहरातील २ दुकानदारांनी दुकाने उघडण्याची परवानगी नसताना दुकाने उघडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरुध्द खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिठवली येथे लसीकरण मोहीम
राजापूर : तालुक्यातील सोलगाव आरोग्य केंद्रातर्फे धोपेश्वर ग्रामपंचायतींतर्गत तिठवली महसूल गावात ४५ वर्षांवरील ८० ग्रामस्थांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. धुतपापेश्वर सरपंच दत्ता करंबेळकर, तिठवली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष कृष्णा तेवणेकर, सुधाकर ठुकरुल, शंकर कोसंबे आदींनी लस देण्याचे नियोजन केले होते.