देवरुख- देवरुखनजीकच्या आंबवली गावातील गणपत सूर्याजी पाष्टे, (पाष्टे वाडी) यांच्या घराच्या आवारातील विहीरीत पडलेल्या बिबट्याला सोमवारी सकाळी वनविभागाने सुखरुप बाहेर काढले आहे.सोमवारी सकाळी ३.५ फूट उंचीचा दगडी कठडा असलेल्या विहिरीत बिबट्या पडलेची माहिती संतोष पाल्ये यांनी वनविभागाला दिली. यानंतर विभागाचे विभागीय वन अधिकारी र. शी. भवर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, देवरुखचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक न्हानू गावडे, शर्वरी कदम, लगेचच घटनास्थळी दाखल झाले.
मिलिंद डाफळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने ९.३० वाजता पिंजऱ्यात सुरक्षितरित्या बिबटयाला जेरबंद करण्यात आले. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी देवरुख यांच्याकडून तपासणी करून सुरक्षितरित्या नर जातीच्या सुमारे ५वर्षे वाढीच्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हा बिबट्या सावज पकडण्याच्या नादात विहीरीत पडला असावा असा अंदाज वनविभागाकडुन वर्तविण्यात आला.