शिरगाव : कराड-चिपळूण मार्गावरील अलोरे शिरगाव हद्दीत बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. काहींच्या कोंबड्या फस्त केल्या, तर एका वासराला जखमी केले. या घटनेची गंभीरपणे दखल घेत, वनविभागाचे अधिकारी राजेंद्र शिंदे व शिरगाव पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी मंगळवारी पाहणी केली.
शिरगाव येथील मनीष मोहिते यांच्या घराशेजारी सोमवारी रात्री १ ते सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बिबट्या आला होता. यावेळी कोंबड्याच्या आवाजाने मोहिते जागे झाले आणि त्यांनी बिबट्याला अंगणात फिरताना पाहिले. त्याने आपल्या गोठ्यातील गुरांना घरात बांधले आणि काही कोबड्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिसाळलेल्या बिबट्यासमोर जाण्याचे त्यांचे धारिष्ट्य झाले नाही. बिबट्याने कोंबड्या फस्त करून एका वासराला जखमी केले. याबाबतची माहिती मोहिते यांनी शिरगाव तंटामुक्त अध्यक्ष विनायक शिंदे यांना दिली. त्यानुसार, विनायक शिंदे यांनी पाहणी केली.
त्याचबरोबर, अलोरे शिरगाव पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पाहणी करून, वनविभाग अधिकारी राजेंद्र शिंदे यांना माहिती दिली. शिरगाव सरपंच अनिल शिंदे, संतोष नाचरे, विनोद सुर्वे, वनपाल राजेंद्र शिदे यांनी पाहणी केली. यावेळी माजी उपसरपंच प्रवीण सावंत, शिरगाव सोसायटीचे संचालक बाळू शिंदे उपस्थित होते.