गुहागर : तीन ते चार दिवस कोणतेही भक्ष्य न मिळाल्याने उपासमारीने तडफडणाऱ्या ४ ते ५ महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील रानवी येथे घडली. त्याच्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यानी त्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे नेले. मात्र, त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.गुहागर तालुक्यातील रानवी येथील प्रमिला रमेश बारगोडे यांच्या घराशेजारी असलेल्या फाट्याच्या खोपटीखाली हा बिबट्या सापडला. उपासमारीने तडफडणाऱ्या बिबट्याचा सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ओरडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून त्यांनी घराच्या बाहेर येऊन आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी बिबट्या नजरेस पडला.
रमेश बारगोडे यांनी रानवीचे पोलीसपाटील यांना याबाबत माहिती दिली. पोलीसपाटलांनी गुहागर पोलिसांना फोन करून बिबट्या सापडल्याचे कळवले. त्यानंतर वन विभागाचे वनरक्षक आर. पी. बंबर्गेकर यांना कळवले. वनरक्षक आर. पी. बंबर्गेकर, सूरज तेली, रामदास खोत, चिपळूणचे वनपाल तटकी रानवी येथे आले.
रानवी येथे फाट्याच्या खोपटीखाली बिबट्याची तडफड व घरघर सुरू होती. बिबट्याला पिंंजऱ्यातून नेण्यासाठी चिपळूण येथून वन विभागाचे वाहन मागवण्यात आले. परंतु त्याला उशीर होईल म्हणून येथीलच खासगी वाहनातून त्यांनी चिपळूण येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे नेले.
वाहनात भरतानाच बिबट्याची हालचाल पूर्णपणे मंदावली होती. यामुळे चिपळूणला नेईपर्यंत बिबट्याचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी बिबट्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.