रत्नागिरी : जिल्ह्यात फळपीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत असताना खरीप हंगामात शेतकऱ्यांची विमा योजनेप्रती अनास्था असलेली निदर्शनास येत आहे. गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील १२१४ शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, १९९९ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. खरीप हंगामासाठी ५६ हजार ६९ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे. पंतप्रधान फसल पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. परिणामी विमा योजनेव्दारे पिकासाठी केलेला खर्च तरी किमान भरून निघावा, यासाठी शासनाने खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत भात व नाचणी पिकाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कुळाने किंवा भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. पीक विमा योजनेत सहभाग घेतल्यानंतर पिकांना विमा संरक्षण मिळते. पीक पेरणीपासून कापणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट पीक पेरणीपूर्व लावणीपूर्व नुकसानभरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसानभरपाई निश्चित करणे, काढणीपश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामुळे पिकाचे नुकसान याची दखल घेण्यात येते.यावर्षी या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता इफ्को टोकियो इन्सुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरुवातीला २३ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या अल्प प्रतिसादामुळेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील १२१४ शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. ६६६.१ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला होता. संबंधित क्षेत्राची विमा संरक्षित रक्कम २ कोटी ५९ लाख ७६ हजार ८४७ असताना विमा हफ्त्याची ५ लाख १९ हजार ५७६.३ इतकी रक्कम शेतकऱ्यांनी जमा केली होती.गतवर्षी भात पिकासाठी प्रतिहेक्टरी ३९००० रूपये मिळून २ कोटी ५९ लाख ७६ हजार ८४७ इतकी विमा संरक्षित रक्कम शेतकऱ्यांना मिळाली होती. यावर्षी एकूण १९९९ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेसाठी प्रस्ताव सादर केला असून, ५६२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आले आहे. शेतकऱ्यांनी ४ लाख ७१ हजार ७०५ रूपये विमा संरक्षित रक्कम भरली असून, त्यासाठी २ कोटी ३५ लाख ८५ हजार ३१७ रूपयांचा परतावा मिळणे अपेक्षित आहे.मुख्य पीक भातजिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, फळबाग लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. कमी श्रमात अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यात ७० हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. दुय्यम पीक म्हणून नागली लावण्यात येते. १४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड केली जाते. ८०९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, ११८० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला तसेच ९१३० हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य, गळितधान्य १०० हेक्टर क्षेत्रावर लावण्यात येते.