शिवाजी गोरे - दापोली --शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांना संबोधून भाषण केले. प्रत्येक शाळेने पंतप्रधानाचे भाषण दाखविण्याची सक्ती करण्यात आली होती. मात्र, शिक्षक दिनाची सुटी असल्याने अनेक शाळांतील मुलांनी शाळेला दांडी मारल्याने सक्तीच्या भाषणाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली.दापोली तालुक्यातील ५० टक्क्यांहून अधिक शाळा ग्रामीण भागातील आहेत. या शाळेत कसल्याही प्रकारच्या सुविधा नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण दाखवायचे, कसे असा सवाल शिक्षकांनी केला. तसेच अनेक शाळेला सुटी असल्याने त्यांना मोदींच्या भाषणासाठी शाळेत आणायचे कसे, असा प्रश्नही शिक्षकांना पडला. मात्र, काही शाळांनी संगणकावर तर काही शाळांनी टीव्ही व प्रोजेक्टरच्या सहाय्याने मोदींचे भाषण दाखविले. परंतु हे भाषण ऐकण्यास कोणीही उत्सुक दिसले नाही. भाषणाची ऐकण्याची व पाहण्याची सक्ती करण्यात आल्याचे कळल्याने शाळेने तात्पुरती व्यवस्था केली. मात्र, शिक्षक दिनी करण्यात आलेली सक्ती विद्यार्थ्यांच्या संख्येवरुन मोडीस निघाली. हक्काची सुटी असल्याने अनेकांनी शाळेलाच दांडी मारुन पंतप्रधानाच्या शिक्षक दिनाच्या सक्तीच्या भाषणावर अघोषित बहिष्कार घातल्याचे चित्र तालुक्यातील शाळेतून पाहायला मिळाले.शिक्षक दिनी पंतप्रधानाचे भाषण घरीच बसून टी. व्ही.वर बघण्यालाही काही विद्यार्थी शिक्षकांनी पसंती दिली, तर काहींनी उपचार म्हणून शाळेत हजर राहणे पसंत केले. काही शाळांनी केवळ भाषण ऐकण्यासाठी मुलांना शाळेत बोलावून घेतले. शिक्षक दिनाची सुटी, पाऊस व शाळेतील अपुऱ्या सुविधामुळे सक्तीचे भाषण ऐकण्याला दापोली थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पंतप्रधानाचे शिक्षकदिनाचे भाषण काही शाळेपर्यंत पोहचलेच नाही. मोदींच्या भाषणाला दापोलीत मिळालेला थंडा प्रतिसाद हा या भागातील शैक्षणिक क्षेत्रातील चर्चेचा विषय ठरला आहे.
मोदींच्या भाषणाकडे विद्यार्थ्यांची पाठ
By admin | Published: September 05, 2014 10:51 PM