राजापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे निलंबन प्रकरण म्हणजे चोर सोडून आमच्या प्रशासन अधिकाऱ्यांना फाशी आहे, तर मग अंतिम निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी नुसत्या झोपेत सह्या केल्या का? या सगळ्याला आमचा लिपिकच जबाबदार का?अशा मनमानी निलंबनाला चोख उत्तर देऊ. वेळ पडल्यास सिंधुदुर्गामध्ये जाऊन आंदोलन करू, असा इशारा राज्य प्रशासन अधिकारी संघटनेचे प्रवक्ता तसेच लिपिक संघटना राज्य कार्याध्यक्ष संजय नलावडे यांनी दिला आहे.
सिंधुदुर्गमधील लाडपागे समितीतील भरती प्रकरणातील कर्मचाऱ्यांवर, प्रशासन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लाड पागे समितीच्या समितीच्या अहवालाप्रमाणे झालेल्या शासकीय नोकरभरतीवर तक्रारी दाखल झाल्यावर ही भरती लाड पागे समितीच्या अहवालानुसार झाली आहे. मग यामध्ये आमच्या सामान्य लिपिकचा दोष काय? असा प्रश्न नलावडे यांनी केला आहे. या भरतीप्रकरणी जे काय आरोप दोषारोप असतील तक्रारी असतीलही आमचा लिपिक, प्रशासन अधिकारी नेहमी आपल्या टिपणीत निकष, निर्देश नमूद करत असतो. मात्र, वरिष्ठ अधिकारी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून टिपणीवर आपले मत मांडून कुणाच्या तरी इशाऱ्यावर सर्व नियम बासनात बांधून कोणतीही कार्यवाही पूर्ण करतो किंवा लिपिकला प्रशासन अधिकाऱ्याला त्याचे मत बदलायला लावतो हे आपण गेल्या माझ्या १७ वर्षांपासून अनुभवत अशा टिपण्यांचा गैरवापर होऊ दिला नाही प्रत्येक लिपिक प्रशासन अधिकाऱ्याने कोणत्याही विषयावर सुस्पष्ट मत मांडले की, वरचा अधिकारी दुखावला जातो आणि मग संघर्षाची लवंगी माळ, धुमसत जाते आणि शेवट निलंबनात होतो.
सिंधुदुर्गमध्ये आमच्या प्रशासन अधिकाऱ्यावर जे निलंबनाचं बाळंट आलंय यात नेमकं काय आहे? यात आमचे सर्व लोक १०० टक्के निर्दोष आहेत असे मला वाटून उपयोग नाही, पण जर आमच्या केडरवर जाणून बुजून कुणी अन्याय केला असेल तर आम्ही प्रशासन अधिकारी सिंधुदुर्गमध्ये येऊन जाब विचारू, नव्हे वेळ पडलीच तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या दारावर येऊन ठाण मांडून बसू प्रशासन अधिकारी संघटना पूर्णपणे या घटनेकडे लक्ष ठेवून आहे. प्रामाणिकपणे काम करून निलंबन होत असेल त्याला आमचा सामान्य प्रामाणिक लिपिक अजिबात भीक घालणार नाही, असेही संजय नलावडे यांनी सांगितले.