लोकमत न्यूज नेटवर्क
पावस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिलेल्या खात्यामध्ये फळप्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. येत्या महिन्याभरात आपण संबंधित अधिकारी आणि बागायतदारांची बैठक घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू, असे आश्वासन केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे यांनी बागायतदारांना दिले. बागायतदारांच्या परताव्याबाबतही आपण पाठपुरावा करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे आंबा, काजू बागायतदारांची बैठक मंत्री यांनी घेतली. यावेळी भाजपचे माजी मंत्री, आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, बागायतदार आनंद देसाई यांच्यासह सागर चाफळकर, प्रकाश साळवी, मंगेश साळवी, अविनाश गुरव, उमग साळवी, सुहास शिंदे उपस्थित होते.
यावेळी पावसचे आंबा बागायतदार विजय देसाई आणि परिवाराकडून मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बागायतदारांतर्फे वादळ, महापूर, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मंत्री नारायण राणे यांना निवेदन देण्यात आले. आपल्या छोटेखानी भाषणात मंत्री राणे म्हणाले की, बागायतदारांनी दिलेल्या निवेदनाचा अभ्यास करून आपण प्रश्न सोडवू. परताव्याच्या रकमेबाबत आपण पाठपुरावा करू. हा विषय पुन्हा मांडण्याची वेळ बागायतदारांवर येणार नाही, याची काळजी आपण घेऊ.
फळप्रक्रिया उद्योग आपल्याकडे असलेल्या खात्याध्येच आहे. त्यामुळे त्या माध्यमातून आपल्याला खूप काही करता येईल. त्यासाठी महिन्याभरात आपण संबंधित अधिकारी आणि बागायतदार अशी बैठक घेऊ. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सात वर्षांत समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून काम केले आहे. त्यासाठी २६ योजना आणल्या आहेत. भारतात विविध योजना राबवताना त्यांनी जगात भारताची प्रतिष्ठाही वाढवली आहे, असे ते म्हणाले.