राजापूर : कोरोना काळात राजापूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटवर असताना त्याही परिस्थितीत २४ तास काम करत रुग्णांना सेवा देण्याचे काम राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. राम मेस्त्री करत आहेत. त्यांनी आपल्याकडील वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त अधिभार काढून घ्यावा, असे लेखी पत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे दिले आहे.
ओणी कोविड रूग्णालयातील अपुरे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, राजापूर ग्रामीण रूग्णालयातील अपुरे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यामुळे आपणावर २४ तास कामाचा ताण येत आहे. त्यामुळे मानसिक दडपणाखाली काम करावे लागत आहे. त्यामुळे आपल्याकडील राजापूर ग्रामीण रूग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक पदाचा अधिभार काढून घ्यावा, अशी मागणी डॉ. मेस्त्री यांनी केली आहे.
ओणी येथील कोविड रुग्णालयातील चारपैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्याने राजीनामा दिला असून, तो मंजूर होऊन त्याला ७ जुलै रोजी कार्यमुक्त करण्यात आले आहे. तर उर्वरित तीन वैद्यकीय अधिकारी हे १८ जुलैनंतर कामकाज पाहणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. तसे त्यांनी १८ जून रोजी राजीनामा पत्र देऊन कळविले आहे. तसेच राजापूर ग्रामीण रूग्णालयात कार्यरत असणाऱ्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी डॉ. जनन्नाथ गारूडी यांना कायमस्वरूपी पुणे येथे नोकरी मिळाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. उर्वरित एक वैद्यकीय अधिकारी डॉ. बागचंद्र चौधरी हे सुध्दा त्यांचे राजीनामा पत्र घेऊन गुरूवारी आपल्याकडे आले होते.
अपुऱ्या मन्युष्यबळावर काम दोन रूग्णालये काय पण एक रुग्णालय चालविणे मला शक्य नाही. माझ्यावर देण्यात आलेला राजापूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार तसेच ओणी येथील कोविड रुग्णालयाचा अतिरिक्त पदभार त्वरित काढून घ्यावा अन्यथा मलाही राजीनामा देणे अपरिहार्य ठरेल, असे डाॅ. मेस्त्री यांनी या पत्रात म्हटले आहे. एवढ्या अपुऱ्या सेवांमध्ये मानसिक तणावाखाली काम करणे मला शक्य नसल्याचेही म्हटले आहे. या पत्राच्या प्रती डॉ. मेस्त्री यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व आमदार राजन साळवी यांना दिल्या आहेत.