खेड : छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज या थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे जीवनचरित्र व त्यांनी केलेले महान कार्य आजच्या तरुण पिढीला ज्ञात व्हावेत म्हणून आजच्या पवित्र दिनी खेड पंचायत समितीमध्ये ग्रंथालय सुरू करणार असून, या थोर व्यक्तींवरील महत्त्वाचे ग्रंथालय व माहिती उपलब्ध करणार असल्याची माहिती खेडच्या पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे यांनी दिली.
खेड पंचायत समितीमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहताना त्या बाेलत हाेत्या. त्या पुढे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय घटनेमुळेच सर्वसामान्य व्यक्तीला सभापती पदाचा व तत्सम पदाचा लाभ घेता येतोय. हे त्रिवार सत्य असून माझ्यासारखी शेतकरी कुटुंबातील स्त्री सभापती म्हणून काम करीत आहे. हे फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, त्यामुळे मिळालेले अधिकार व शिवसेनाप्रमुखांचे विचार म्हणूनच मी सभापती होऊ शकले, असे त्यांनी सांगितले.
खेड पंचायत समितीच्या सेस निधीतून तरतूद करणार असून, आमदार योगेश कदम यांचीही मदत घेणार आहे. हे साहित्य उपलब्ध करण्यासाठी सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती व समाजबांधवांची मदत घेणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी उपसभापती जीवन आंब्रे, माजी बांधकाम व आरोग्य सभापती अण्णा कदम, गटविकास अधिकारी गुरुनाथ पारशे, गणेश मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख विजय जाधव, तालुका संघटक महेंद्र भोसले, महेश जगदाळे, तुषार मोरे तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. खेड पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली.